तळवडे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रचारासाठी पक्ष, उमेदवार व कार्यकर्ते यांच्याकडून विविध माध्यमांचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय यंत्रणेच्या वतीने मतदार जनजागृती करुन मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यातच काही तरुण नेटिझनकडून लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे व योग्य उमेदवाराला मतदान करण्याचा आग्रह धरला जात आहे.
निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी विविध पक्ष, उमेदवार कार्यकर्ते हे प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करत आहेत. काही नेटिझन मात्र मतदारांना मतदान करा, आपला हक्क बजावून योग्य उमेदवार निवडावा यासाठी आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी विविध ऑडिओ, व्हिडिओ क्लिप, तसेच टेक्स्ट मेसेज आणि फोटो तयार केले असून ते विविध सोशल मीडिया ग्रुपमध्ये, वैयक्तिकरीत्या एकमेकांना पाठवत आहेत. यामध्ये शेअर केलेल्या एका इमेजमध्ये आपण कोणाला आणि का मतदान करतो या मथळ्याखाली नगरसेवकांनी, आमदारांनी, तसेच खासदारांनी जनसेवेची कोणती कामे केली पाहिजेत याची माहिती दिली आहे. अशी कामे करणारा उमेदवार विचारपूर्वक निवडावा, असे आवाहन करण्यात येत आहे.तसेच निवडणूक विभागाच्या वतीने नागरिकांना दिलेल्या ‘नोटा (नन आॅफ दि अबॉव्ह- वरीलपैकी कोणीही नाही)’ या अधिकाराचा वापर करण्यापेक्षा योग्य उमेदवाराला मतदान करा आपले मत व्यर्थ घालवू नका, भूलथापा-प्रलोभनांना बळी न पडता योग्य लोकप्रतिनिधीची निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत मतदान करा, असे आवाहन करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होत आहे.त्याला तरुण, सुशिक्षित मतदार प्रतिसाद देत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही कविता, व्यंगचित्रे शेअर केले जात असून, त्यातून विविध स्तरांतील नागरिकांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा मांडण्यात आलेल्या आहेत. एकंदर लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सोशल मीडियाचा प्रभावी वापर होत असून त्याचा मतदारांवर प्रभाव पडत असल्याने, निवडणूक प्रचारात सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावत आहे.मावळ तालुक्यात २५ ठिकाणी मतदार जागृती मंचाची स्थापनावडगाव मावळ : मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदारजागृतीसाठी मावळ तालुक्यात २५ ठिकाणी मतदारजागृती मंचाची स्थापना करण्यात येणार असून गुरुवारी चार ठिकाणी या मंचाचे उद्घाटन झाले. मावळ तालुक्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार तालुक्यातील शासकीय कार्यालय, शाळा, कॉलेज आदी ठिकाणी मतदान साक्षरता मंचाची स्थापना करण्यात येणार आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष भागडे यांच्या हस्ते पंचायत समिती, पोलीस ठाणे, तालुका कृषी खाते, वनखाते या ठिकाणी मंचाचे उद्घाटन झाले. या वेळी अतिरिक्त अधिकारी रणजित देसाई व अधिकारी महेंद्र वासनिक, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर आदी उपस्थित होते.भागडे म्हणाले, ाात मंडलाधिकारी कार्यालयांतर्गत बूथ लेवल आॅफिसर चुनाव पाठशाला स्थापन केलेली आहे. १३ ठिकाणी महिला मेळावे घेण्यात येणार आहेत. पालकांकडून ५० हजार संकल्प पत्र भरून घेण्यासाठी संकल्प पत्रदिली आहेत. आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू. प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, अशी शपथ शासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली.