पिंपरी : प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर मतदारनोंदणी करून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती. अर्ज दाखल करून घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीनही मतदारसंघातील कार्यालयात सायंकाळी साडेसहापर्यंत रांगा लागलेल्या होत्या. काही राजकीय कार्यकर्त्यांनी गठ्ठेच्या-गठ्ठे आणले होते. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी नियमानुसारच अर्ज स्वीकारले जातील, असे सांगितल्याने काहींचा हिरमोड झाला. आजअखेर सुमारे सव्वा लाख नागरिकांनी अर्ज सादर केले आहेत.मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोगाने मतदान जागृती अभियान राबविले होते. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी अगोदर नोंदणी करावी, असे आवाहन निवडणूक विभागाने केले होते. त्यानुसार १५ सप्टेंबर ते १६ आॅक्टोबरदरम्यान ही मोहीम राबविण्याचे निश्चित केले होते. प्रभाग कार्यालये, करसंकलन कार्यालये आणि शहरातील पंधरा महाविद्यालयांत नोंदणीची सोय केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत प्रचारही केला होता. नोंदणीला प्रतिसाद चांगला मिळत आहे. त्यामुळे नोंदणी अभियानास मुदतवाढ दिली होती. मुदतवाढीचा आजचा शेवटचा दिवस होता. राजकीय कार्यकर्त्यांची तारांबळमतदारनोंदणीचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच केंद्रावर नागरिकांबरोबरच विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांचे कार्यकर्त्यांनी एकत्रित केलेले अर्ज जमा करण्यासाठी गर्दी झाली होती. ही गर्दी सायंकाळी चारनंतर अधिक झाली. गठ्ठेच्या गठ्ठे आणून कार्यकर्ते माझे अर्ज घ्या, अशी विनवणी अधिकाऱ्यांना करीत होते. त्यामुळे कार्यकर्ते आणि कर्मचारी यांच्यात शाब्दिक वादावादीच्या घटनाही काही केंद्रावर घडल्या. चिंचवड, पिंपरी, भोसरी अशा तीनही मतदारसंघात सायंकाळी सातपर्यंत गर्दी दिसून आली. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील थेरगाव येथील कार्यालयावर अधिक गर्दी वाढल्याने सायंकाळी सहाच्या सुमारास पोलीस बंदोबस्तही मागविण्यात आला होता. कार्यालयीन वेळेनंतर कोणाचेही कर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी ठेवली होती. निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप गावडे म्हणाले, ‘‘१६ तारखेपर्यंत चिंचवडला ३४ हजार त्यानंतर आजपर्यंत बारा हजार अर्ज दाखल झाले आहेत. मतदारनोंदणीला प्रतिसाद होता.’’ नेमकी मतदारनोंदणी किती झाली. याबाबतचा अधिकृत आकडेवारी सोमवारी कळेल. (प्रतिनिधी)राजकीय दबाव : स्थलांतराचे अर्ज अधिकप्रभागरचना जाहीर झाल्यानंतर काही वाड्या, वस्त्या आणि सोसायट्यांची मोडतोड केली आहे. हक्काचे मतदार इकडून तिकडे समाविष्ट करून घेण्यासाठी अर्थात मतदारनोंदणीपेक्षा स्थलांतराचे अर्ज अधिक होते. त्यामुळे शेवटच्या दिवशी मतदारांचे गठ्ठेच्या गठ्ठे घेऊन कार्यकर्ते मतदार नोंदणी कक्षावर हजर होते. अधिकारी अर्ज घेत नसल्याने कर्मचारी आणि कार्यकर्ते यांच्यात वादावादी सुरू होती. काही लोकांनी राजकीय नेत्यांना फोन लावून कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला. मतदारनोंदणीसाठी केलेल्या आवाहनानुसार नागरिकांना आवाहन केले होते. त्यानुसार कालपर्यंत चिंचवडमध्ये ४११३२, पिंपरीत २० हजार ५९६, भोसरी विधानसभा मतदारसंघात २९ हजार ५०२ अर्ज दाखल झाले होते. - डॉ. यशवंत माने, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग
मतदारनोंदणीस झुंबड
By admin | Published: October 22, 2016 3:56 AM