पुणे : मतदारांना आपले मतदान कोणत्या मतदान केंद्रावर आहे, याची माहिती व्हावी, यासाठी प्रशासनाकडून मतदान स्लिपा वाटल्या जात असून त्याची सुरुवात गुुरुवारपासून शहरात सुरू होत आहे़ यापूर्वी राजकीय पक्षांकडून मतदारांना स्लिपा वाटण्याचे काम केले जात असे़ या स्लिपांच्या खालच्या भागावर उमेदवार आपला प्रचार करीत असे़ या स्लिपा घेऊन मतदार मतदान केंद्रावर जात असत़ एक प्रकारे प्रचाराची मुदत संपल्यानंतरही स्लिपा वाटण्याचे निमित्त करून उमेदवारांकडून प्रचार केला जात असे़ अनेक उमेदवारांना अशा प्रकारे स्लिपा वाटप करणे आर्थिक व अन्य कारणामुळे शक्य होत नसे़ हे प्रशासनाचे काम असल्याने ते प्रशासनानेच करावे, असा निर्णय झाल्यानंतर मागील विधानसभा निवडणुकीपासून प्रशासनामार्फत मतदान स्लिपा वाटण्यास सुरुवात करण्यात आली आहे़ महापालिका निवडणुकीसाठी मतदान स्लिपा आल्या असून बुधवारी क्षेत्रीय कार्यालयात या स्लिपा मतदान केंद्रांनुसार वेगवेगळे गठ्ठे करण्याचे काम सुरू होते़ प्रत्येक मतदान केंद्र अधिकाऱ्यांमार्फत महापालिकेकडून गुरुवारपासून या स्लिपा वाटण्यास सुरुवात करण्यात येणार आहे़ पुढील दोन दिवसांत सर्व मतदारांपर्यंत या स्लिपा पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे़
मतदान स्लिपा वाटपास आजपासून सुरुवात
By admin | Published: February 16, 2017 3:19 AM