पुणे : सकाळचे प्रसन्न वातावरण, ‘गानसरस्वती’चे ह्रदयाला भिडणारे आर्त स्वर, आलापी गायनातून रसिकांसह किशोरीतार्इंची आत्मानंदी लागलेली टाळी अशा वातावरणात एका अनोख्या ‘स्वरमयी’ मैफलीचा आनंद रविवारी रसिकांनी घेतला. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या स्वरांचा अभिषेक श्रोत्यांवर झाला. त्यांनी सादर केलेल्या या अद्वितीय सुरांसमोर रसिक नतमस्तक झाले आणि टाळ्यांच्या कडकडाटात रसिकांनी त्यांना मानवंदना दिली. किशोरीताईंच्या जादुई मैफलीचा दुर्मिळ योग नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘गानसरस्वती’ महोत्सवात तिसऱ्या दिवशी जुळून आला. हुसैनी तोडी रागातील ‘निरंजन की जे’ या झपतालातील बडा ख्यालमधून समाधीवस्था लावणा-या अमृतमयी स्वरांची बरसात झाली. ख्याल, ठुमरी आणि भजन यांच्यावर उत्तम प्रभुत्व असलेल्या किशोरीताईंच्या गायकीचे ‘आलापी’ हे वैशिष्ट्य. त्याचीच प्रचिती देत तब्बल दीड तास आलापी आळवत त्यांनी शास्त्रीय संगीताच्या अभिजात सूरांची ताकद दाखवून दिली. जयपूर घराण्याच्या गायकीचे सौंदर्य उलगडणा-या गायनातून उपस्थित देहभाग विसरुन गेले होते. सुखिया बिलावल रागामध्ये किशोरीतार्इंनी ‘देवी दुर्गे’ ही झपतालातील बंदिश खुलवली. ‘डगर चलत मोरी’ या स्वरचित बंदिश सादर करत आमोणकर यांच्या मैफलीची भैरवी केली. (प्रतिनिधी)
‘गानसरस्वती’कडून स्वरांचा अभिषेक
By admin | Published: February 20, 2017 2:38 AM