पुणे:- भ्रामक विकासाच्या पाठीमागे धावताना आपण निसर्गाची यथेच्छ नासधूस केली आहे. त्याच्याच परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. निसर्गाची रचनाच मुळात अशी आहे की, त्यामुळे सगळ्यांचे जीवन फळेल, फुलेल आणि विकसित होईल. परंतु, निसर्गातील इतर संपत्तीवर अधिराज्य गाजविण्याच्या मनुष्यजातीच्या हव्यासापोटी मानवाने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी' हे आपल्या जगण्याचं सूत्रं व्हावं, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.
फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचाच्या वतीने देण्यात येणारा वृक्षमित्र पुरस्कार यंदा विठ्ठल उर्फ भाई कात्रे यांना जगताप यांच्या हस्ते रविवारी (दि.३०) प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ५५ वृक्षांची रोपे, अकरा हजार रुपये, सन्मानचिन्ह, तिरंगी शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेविका लता राजगुरू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र माळवदकर, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, आर.के. बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्री साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. हजारो वृक्षांचे रोपण करून त्यांचे जतन करून समाजासमोर भाई कात्रे यांनी घातलेल्या वस्तुपाठाचे आदर्श उदाहरण लोकांपुढे यावे, यासाठी कात्रे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जगताप म्हणाले की, जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर विकास की पर्यावरण अशा व्दिधा मन:स्थितीत मनुष्यप्राणी अडकलेला आहे. परंतु, निसर्गाच्या हातात हात घालून देखील विकास साधता येतो, याची अनेक उदाहरणे प्रगत देशांमध्ये दिसून येतात. निसर्गाचा ऱ्हास होणे, हे मनुष्यजातीच्या समूळ उच्चाटनाकडे असलेली वाटचाल आहे.
भाई कात्रे यांनी मनोगत व्यक्त केले. विठ्ठल गायकवाड यांनी संयोजन आणि सूत्रसंचालन केले.