पुणे : रुग्णाला दुसऱ्या दवाखान्यात हलवण्यास सांगितल्याच्या कारणावरून वॉर्डबॉयला मारहाण करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी भवानी पेठेतील गूळ आळीमध्ये घडली होती. तुषार रवींद्र चंगळ (वय २५), अभिषेक अशोक चंगळ (वय २५), अतुल मंगेश जळगावकर (वय २८), तौसिफ शकुर शेख (वय ४५, सर्व रा. भवानी पेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सिद्धेश्वर शिंदे (वय ३४, रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हे गूळ आळीमधील गीतांजली कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या दवाखान्यात वॉर्डबॉय म्हणून नोकरी करतात. सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास आरोपी तरुण एका रुग्णाला घेऊन दवाखान्यात आले. त्या वेळी रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नव्हते. शिंदे यांनी डॉक्टर नसल्याचे सांगत रुग्णाला दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जाण्यासंदर्भात विनंती केली. या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी वॉर्डबॉयला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली. खडक पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चौघांना अटक केली असून, तपास उपनिरीक्षक शैलजा जानकर करीत आहेत. (प्रतिनिधी)
वॉर्डबॉयला मारहाण करणारे गजाआड
By admin | Published: March 20, 2017 4:36 AM