बिबट्याच्या दहशतीने वडगाव परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी
वडगाव-कडूस रस्ता बिबट्याच्या धास्तीने निर्मनुष्य होत आहे.
वडगाव परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून बिबट्याचा वावर वाढल्यामुळे वडगाव, तनपुरेवस्ती,
चांडोली, वरुडेवस्ती या परिसरात नागरिकांना शेतात काम करणे अवघड झाले आहे.या आठ दिवसांत या परिसरात
बिबट्याने दोनदा मानवी हल्ला केल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. दि.३ ऑगस्ट रोजी तनपुरेवस्ती येथे दुचाकीवरून
चाललेल्या संदीप मारुती पाटोळे या कामगार युवकावर रात्रीच्या वेळी आठ वाजता रस्त्याच्या कडेला दबा धरून
बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकीवर उडी मारून हल्ला केला होता. त्यामध्ये त्या कामगार युवकाच्या पायास गंभीर
जखम झाली होती. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी येथून जवळच असलेल्या आगरमाथा या ठिकाणी रात्री आठ वाजता
दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन युवकांवर बिबट्याने हल्ला केला. परंतु या युवकांनी प्रसंगावधान राखून दुचाकीवरून
धूम ठोकली, त्यामुळे किरकोळ जखम झाली. या दोन मानवी हल्ल्यांच्या घटनेमुळे वडगाव ते कडूस या रस्त्यावर
रात्रीच्या वेळी दुचाकीवर प्रवास करणे जिकिरीचे झाले असून रात्रीच्या वेळी वडगाव-कडूस रस्ता निर्मनुष्य होत आहे.
वडगाव व परिसरात शेतीकाम करणारे शेतकरी बिबट्याच्या दहशतीने धास्तावले असून शेतात काम करणे अवघड
बनले आहे. त्यामुळे लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.