लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर: वडगाव काशिंबेग गावच्या हद्दीतील पद्मावती मंदिराजवळ घोडनदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर मंचर पोलिसांनी गुरूवारी रात्री (दि २४) छापा टाकून तीन ट्रॅक्टर ट्रॉली व १ पोकलेन मशीन असा ३४ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अंधाराचा फायदा घेत वाळू माफिया फरार झाले आहेत. या भागात वाळू माफियावर झालेली ही तिसरी कारवाई आहे. महसूल प्रशासनाने फारसे लक्ष दिले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मंचर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्यासह पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवले. वडगांव काशिंबेग येथे खुप दिवसांपासुन अवैधरित्या वाळु या गौण खनिजाचे उत्खनन चालु होते. पोलीस आणि महसुल प्रशासन तेथे पोहचण्या अगोदरच वाळु माफीया तेथुन त्यांचे वाहनांसह फरार होत असे. बुधवारी रात्री वडगांव काशिंबेग गावचे हद्दीत पदमावती मंदीराजवळ घोडनदीपात्रात अवैध वाळु या गौण खनिजाचे उत्खनन चालु असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी साकोरे आणि सुलतानपुर भागातुन अचानक छापा मारला. वाळु माफिया आणि त्यांचे साथीदार वाळु उत्खननाचे वाहन सोडून पळून गेले. यावेळी वाळु माफीया यांनी त्यांचे तीन ट्रॅक्टरचे ट्राॅली त्यामध्ये वाळु भरलेली आणि एक ट्रॅक्टर जागेवरच सोडुन तेथुन पळ काढला. तसेच वाळु उत्खनन करीत असणारे पोकलेन मशीन घोडनदीचे पात्रातुन भरलेले पाण्यातुन नदीचे पलीकडे सुलतानुपर बाजुकडे पळवुन घेवुन जात असताना पोलीसानी रात्री अंधारात कडाक्याचे थंडीत पाण्यात उतरून त्यास ताब्यात घेतले. चालक अंधाराचा फायदा घेत पळुन गेला. संपुर्ण रात्रभर सदर भागात कोंबींग ऑपरेशन करून आरोपींचा शोध घेतला परंतु आरोपी अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. यावेळी ३४ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला. त्याबाबत महसुल प्रशासन आंबेगांव यांना पत्रव्यहार करण्यात आला आहे. त्यांनी पंचनामा केला असुन वाळु माफीया यांचेविरूध्द कायदेशीर कारवाई करण्याचे काम चालु आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यापुढे वाळू माफिया तसेच अवैद्य धंदे करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करणार असल्याची माहिती कोरे यांनी दिली. पोलीस यंत्रणेने ही कारवाई केली असताना महसूल प्रशासन मात्र काहीसे सुस्त होते.
फोटो :वडगाव काशिंबेग येथील घोडनदी पात्रात वाळू उपसा करणारी वाहने पोलिसांनी जप्त केली.