वडगाव मावळ : पुणे-मुंबई रोडवर साते गावच्या हद्दीत असलेल्या फ्लेवर्स फॅमिली रेस्टॉरंट येथे झालेल्या भांडणातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिस उपनिरिक्षक नितीन मोहिते यांच्या मांडीत पिस्तूलमधून गोळी झाडून त्यांना जखमी केले. ही घटना शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
दादा बाळू ढवळे,(वय ३८ रा.पुनावळे ता.मुळशी), संतोष उर्फ बिट्या बाळासाहेब गायकवाड (वय २१), सुनिल विलास पालखे (वय २७, रा. दोघेही रा.जांबे ता.मुळशी) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.
वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार फ्लेवर्स हॉटेलच्या पार्कींगमध्ये मनोज सिध्दाया तेलगु (वय २९) व त्याचे अन्य मित्र रा.देहूरोड यांचा दादा ढवळे यांच्याबरोबर वाद झाला. ही घटना पोलिस ठाण्यात कळाल्यानंतर पोलिस उपनिरिक्षक नितीन मोहीते व अन्य पोलिस त्या ठिकानी गेले. त्यावेळी दादा ढवळे हा टॉयलेटमधून बाहेर येत असताना रोखले. दादा ढवळे याने कमरेला असलेला पिस्तूल काढून मोहिते यांच्या उजव्या पायाच्या मांडीवर गोळी झाडली. या घटनेनंतर पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्या कडील पिस्तूल जप्त केले आहे. जखमी अवस्थेत मोहिते यांना सोमाटने फाटा येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले. पहाटे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून मांडीतील गोळी काढली. घटनास्थळी पोलिस अधिक्षक संदिप पाटील, डीवायएसपी ज्ञानेश्वर शिवतरे आदींनी भेट दिली. आरोपी हे मुळशीतील असून त्यांची चौकशी चालू आहे.