अंगद राठोडकर, दिघीचऱ्होलीचे ग्रामदैवत वाघेश्वरमहाराज मंदिर परिसर विकासाचा व जीर्णाेद्धाराचा विडा येथील स्वकाम सेवा संघाने उचलला आहे. गेल्या २० वर्षांपासून संथ गतीने सुरू असलेल्या या कामाने गेल्या दोन वर्षांत चांगलाच वेग घेतला आहे. मंदिराचा चेहरा-मोहराच बदलून गेलेला दिसत आहे. बाजूने संथ गतीने वाहणारी पवित्र इंद्रायणी, मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या, भाविकांचे स्वागत करणारी भव्य कमान, त्यातून आत जाताच छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, आकर्षक कोरीव नक्षीकाम केलेले दगडी खांब व केवळ दगडांचाच वापर करून उभारण्यात आलेला सभामंडप, उंच शिखर, आध्यात्मिक व वैज्ञानिक जगाला गवसणी घालणारे सुसज्ज गुरुकुल, मुबलक पाणी, लखलखणारा तेजोमय प्रकाश, नयनरम्य व विस्तीर्ण उद्यान असा मंदिर परिसर तयार करण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे १ कोटी २५ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. उर्वरित कामासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याची माहिती सेवा संघाने दिली. देवगिरीचे राजे यादवराजा यांच्या काळात मंदिराचे बांधकाम झाल्याचा उल्लेख येथील शिलालेखावरून समजतो. विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या मावशी गोदाबाई कुलकर्णी याच चऱ्होलीच्या. त्यांची भावंडे व त्यांचा सततचा सहवास या गावाला लाभलेला. बाराव्या शतकात बांधण्यात आलेल्या या मंदिर व आसपासच्या परिसरात वाघांची संख्या अधिक असल्यामुळेच या परिसराचा उल्लेख ज्ञानेश्वरीत ‘व्याघ्रेश्वरी’असा करण्यात आल्याचे दिसून येते. निसर्गसृष्टीने नटलेला डोंगर-दऱ्यांचा भाग, बाजूने वाहणारी पवित्र इंद्रायणी, समृद्ध शेती व अपार कष्ट करून सुखी झालेला शेतकरी, अशीच चऱ्होलीची ओळख आहे. गाव आणि बारा वाड्या व पंचक्रोशीतील नागरिक भक्तीभावाने व श्रद्धेने ग्रामदैवत वाघेश्वरमहाराजांची पूजा, आरती करतात. १९६७ मध्ये श्रावणी सोमवारी नागराज वाघेश्वर महाराजांच्या पिंडीवर अवतरले. ते तब्बल आठवडाभर पिंडीवरच बसून असल्याचे सांगण्यात येते. आळंदी येथील सुरेश फोटो स्टुडिओत त्या वेळचे फोटो आजही उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. दोन कोटींच्या प्रस्तावित खर्चात वाढ होऊन हा खर्च अडीच कोटींपेक्षा जास्त होत असल्यामुळे दानशूरांनी पुढे येऊन विकासाला हातभार लावण्याची गरज असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. मंदिर परिसरात विविध कामे करण्यात येत आहेत. हा परिसर आगामी काळात एक आकर्षक पर्यटनस्थळ व्हावे, ही ग्रामस्थांची इच्छा आहे.
वाघेश्वर मंदिर परिसर विकासास गती
By admin | Published: November 16, 2015 1:50 AM