लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सहकारनगर भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगार माधव हनुमंत वाघाटे याच्या खून प्रकरणात आनंद निवृत्ती कामठे हा गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना २१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बिबवेवाडी ओटा परिसरात ही घटना १५ मे रोजी रात्री दीडच्या सुमारास घडली. याबाबत २१ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. आरोपी व त्याच्या साथीदारांनी वाघाटे यास लाकडी बांबू, दगड, लोखंडी रॉडसारखे हत्यार तसेच ट्यूबलाईटने मारहाण करत त्याचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी त्याला अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. कामठे याचे अन्य कोणी साथीदार आहेत का, गुन्हा घडल्यापासून तो फरार होता. यादरम्यान तो कोठे होता. तसेच हा गुन्हा करण्यामागे त्याचा नेमका हेतू काय होता. याचा तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील चैत्राली पणशीकर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली. वाघाटे यांच्या अंत्ययात्रेच्या काढलेल्या रॅलीत सहभागी झाल्या प्रकरणात सुमंत काकडे (वय २१), बंडू निगडे (वय ५०), विराज सांगळे (वय २१), रूपेश थोरवे (वय २३) यांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली.