लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे-नगर महामार्गावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी वाघोली ते लोणी कंद मार्गावर सात किलोमीटरचा दुमजली पूल बांधणार असल्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी केली. या पुलाचे आरेखन पूर्ण झाले असून यासाठी वेगळे भूसंपादन करण्याची गरज नाही. त्यामुळे सहा महिन्यांत काम चालू होईल, असे गडकरी म्हणाले.
पुणे-नगर या रस्त्याप्रमाणेच पुढे औरंगाबादपर्यंतचा रस्ताही ‘डायरेक्ट अॅक्सेस रोड’ केला जाणार आहे. हा सहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असल्याचे गडकरी यांनी सांगितले. शनिवारी (दि. १३) चांदणी चौकातील रखडलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केल्यानंतर गडकरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली.
गडकरी म्हणाले की, दुमजली पूल झाल्यानंतर वाघोली ते लोणी कंद या मार्गावर सोळा मार्गिकांमधून (लेन) वाहतूक सुरु होईल. यामुळे वाहतूक वेगाने पुढे सरकेल. या पुलावरील सर्वात वरचा मार्ग सहा ‘लेन’चा, मधला मार्ग चार ‘लेन’चा, तर जमिनीवरचा मार्ग आताप्रमाणेच चार ‘लेन’चा असणार आहे. पुणे-नगर या रस्त्याप्रमाणेच नगर-औरंगाबाद या मार्गाचेही डायरेक्ट अॅक्सेस डिझाईन करण्याची सूचना केली असल्याचे गडकरी यांनी सांगितले. तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील ५४ किलोमीटरच्या महामार्गाला गती दिली आहे. यासाठी सहाशे कोटी रुपये मंजूर केले असून लवकरच काम चालू होईल, असेही ते म्हणाले.
चौकट
सातारा रस्त्याचे काम मार्चमध्ये होणार पूर्ण
“पुणे-सातारा रस्त्यावरील चारपैकी तीन पुलांचे काम पूर्ण झाली आहेत. उर्वरित रखडलेली काम येत्या मार्चअखेर पूर्ण होतील,” असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. या कामातल्या दिरंगाईला अॅक्सिस बँक जबाबदार होती. त्यांनी करारभंग केल्याने कंत्राटदाराला पैसे दिले गेले नाहीत आणि काम रखडले. या बँकेवर कारवाई करण्याचे पत्र मी संबंधितांना दिले आहे. तसेच तूर्तास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पैसे देऊन प्रलंबित कामे पूर्ण करावीत, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या मार्चअखेर ही कामे पूर्ण केली जातील, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
चौकट
भक्तिमार्गासाठी बारा हजार कोटी
आळंदी-पंढरपूर आणि देहू-पंढरपूर या दोन्ही पालखी महामार्गांवरील अपूर्ण कामे पूर्ण करण्यास माझे प्राधान्य आहे. येत्या दीड वर्षात बारा हजार कोटी रुपये खर्च करुन या दोन्ही महामार्गांची कामे पूर्ण केली जातील. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि खासदार गिरीश बापट यांची वेळ घेऊन भूमिपूजनाची तारीख निश्चित करण्याची सूचना केली आहे. हे दोन्ही मार्ग केवळ महामार्ग न होता ‘भक्तिमार्ग’ बनावेत असा प्रयत्न आहे. या दृष्टीने महामार्गावर संतवचने असतील, संत ज्ञानेश्वर-तुकाराम यांच्या अभंगांमध्ये उल्लेखलेल्या वृक्षवल्लींची लागवड महामार्गाच्या बाजूने केली जाईल. अनवाणी चालताना वारकऱ्यांचे पाय भाजू नयेत यासाठी काही करता येईल का, असाही प्रयत्न केला जातो आहे.