आव्हाळवाडी : वढू येथून वाघोलीला जोडलेली पाणीपुरवठा योजनेची मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे वाघोलीकरांना मागील सहा दिवसांपासून पाण्याअभावी हाल सोसावे लागत आहेत. ग्रामपंचायतकडून पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरु केले असून लवकरच पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरु होणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभार यांनी सांगितले. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कुंभार यांनी केले आहे.
लोणी कंद येथे खोदकामदरम्यान वाघोली (ता. हवेली) पाणीपुरवठा योजनेची वढू येथून आलेले पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली आहे. पूर्वीची पाईपलाईन लोणी कंद येथील पेट्रोल पंपाच्या जागेमधून टाकण्यात आली असून, खोलवर गाडली गेली नाही. त्या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या जागेच्या सपाटीकरणाचे काम चालू आहे. पाईपलाईन खोलवर नसल्यामुळे जेसीबीने सपाटीकरण करताना पाईपलाईन फुटली. दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी उपसरपंच समीर भाडळे यांनी पाहणी करून केली. गुरुवार ११ फेब्रुवारी रोजी पाईपलाईन फुटली ती १२ तारखेला ग्रामपंचायतकडून दुरुस्ती करण्यात आली. दुरुस्ती करण्यात आलेली पाईपलाईन पुन्हा त्याच दिवशी (दि. १२) फुटली. आणि पुन्हा एकदा दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर १३ तारखेला पाणीपुरवठा सुरळीत सुरु झाला. मात्र पुन्हा एकदा रविवार १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाईपलाईन फुटली. गुरुवार (दि. ११) पासून तीनवेळा पाईपलाईन फुटली असून ग्रामपंचायतकडून दुरुस्तीचे काम चालू आहे. मागील ११ तारखेपासून सुरळीत पाणी पुरवठा नसल्यामुळे नागरिकांना पाण्या अभावी हाल होत आहेत. पाईपलाईन तात्पुरती दुरुस्ती केल्यास पुन्हा फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाच ते सहा फुट खाली घेऊन कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याचे काम चालू आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभार यांनी केले आहे.
पाणीपुरवठा योजनेची फुटलेली मुख्य पाईपलाईन