वाघोली-आव्हळवाडी : पुणे महापालिकेत तीन वर्षापूर्वी समाविष्ट झालेल्या गावांचा विकास रखडलेला असतानाही २३ गावे महापालिकेत समावेश करणार आहेत. त्या गावांपैकी सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या वाघोलीचा काय विकास होणार? असे विविध सवाल उपस्थित करीत आजी-माजी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी समावेशाला कडाडून विरोध दर्शविला आहे. वाघोलीचा समावेशाला विरोधातील सूर वाढत चालला आहे.
वाघोलीचा महापालिकेत समाविष्ट करावा की नाही, याबाबत ग्रामपंचायत सभागृहात शनिवारी सायंकाळी बैठक बोलविली होती. या बैठकीसाठी आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. महापालिकेत पूर्वी घेतलेल्या ११ गावांची विकास न झाल्यामुळे दुरवस्था झाली आहे. त्यात अजून २३ गावांची भर पडणार आहे. वाघोलीचा कर व गायरान जागा यामध्येच महापालिकेला रस आहे का? समाविष्ट गावात कसा विकास करणार, त्याचा आराखडा तयार केला का ? किती निधी राखीव ठेवणार ? आणि समाविष्ट करण्याच्या अगोदर विश्वासात घेणार का? असे एक ना अनेक प्रश्न वाघोलीकर समोर निर्माण झाले आहेत.
‘आमचा गाव आणि आमची ग्रामपंचयातच बरी’
पुणे महापालिकेचे क्षेत्रफळ बृहन्मुंबई पेक्षा मोठे होईल. महापालिकेला एवढ्या क्षेत्रफळाचा विकास करणे शक्य होईल का ?, स्वतंत्र महापालिका स्थापन करूनच गावांचा समावेश करणे योग्य होईल अन्यथा खूप वाईट अवस्था होऊन अनेक मूलभूत प्रश्न निर्माण होतील यामध्ये वाघोलीची बिकट होईल, सध्या ग्रामपंचायत योग्य विकास करीत आहे. नागरिकांच्या समस्या साठी सध्या १७ सदस्य आहेत, महापालिकेत गेल्यास एक किंवा दोन नगरसेवक असतील वाढती लोकसंख्या व वाढते प्रश्न जाणून घेण्यासाठीही कोणी नसेल, ‘आमचा गाव आणि आमची ग्रामपंचयातच बरी’ असे मत काहींनी व्यक्त केले.
महापालिका समावेशाबाबत समर्थनाच्या भूमिका
वाघोलीचा पुणे महापालिकेत समावेश करीत असताना विरोधासह समर्थनाच्या भूमिका नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत आहेत.आणि समावेशाचे समर्थन करीत आहेत ,तर काहीजण समावेश होऊ नये यासाठी कोर्टात याचिका दाखल करणार आहेत.
लोकसंख्येच्या नुसार ग्रामपंचायतच्या मर्यादेच्या बाहेर वाघोली गाव गेले आहे. त्यामुळे महानगर पालिकेत गेले तर चांगले आहे.पण पुणे महानगरपालिकेचा कारभार येवढा चांगला नाही.
- राजेंद्र परभणे, अध्यक्ष, रोहन अभिलाशा सोसायटी
महानगरपालिका समावेश ह्यावा की नाही याबाबतीत ग्रामस्थांची ग्रामसभा होणे गरजेचे आहे.समावेशाचे फायदे तोटे ग्रामस्थांना समजणे गरजेचे आहे.त्यानंतर ग्रामस्थांनी शासनाच्या बाजूनी जायचे की विरोधात जायचे हे ठरवले पाहिजे.
- संजय सातव, शिवसेना माजी उपाध्याक्ष, पुणे जिल्हा
आगोदर घेतलेल्या ११ गावाचे ग्रामस्थ विकास झाला नाही म्हणून नाराज आहेत.फक्त महसुल गोळा करण्याचे काम पुणे महानगर पालिका करते. नवीन घेणाऱ्या गावासाठी कोणतेही पालिकेचे व्हिजन नाही.जर असेल तर आयुक्तांनी वाघोली ग्रामस्थांशी चर्चा करावी. त्यामुळे वेगळ्या महानगरपालीकेचा विचार होणे गरजेचे आहे.
- राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच
स्वतंत्र महापालिकेबाबत मुख्यमंत्र्याशी चर्चा
हद्दीत वाढ होत असल्याने वस्तुस्थिती लक्षात घेऊन पुणे महापालिकेचे विभाजन करून पूर्वी हवेलीसाठी आणखी एक स्वतंत्र पालिका उभारणे शक्य आहे का? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा सुरू आहे.
- ज्ञानेश्वर कटके, सदस्य, पुणे जिल्हा परिषद