महापालिकेत समावेशावरुन स्थानिकांचा प्रश्न
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वाघाेलीच्या समस्या नवीन नाहीत. वर्षानुवर्षे येथील रहिवासी वाहतूक काेंडी, खराब रस्ते, पाणी टंचाई, कचरा अशा अनेक प्रश्नांना सामाेरे जात आहेत. क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या दोन्ही दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात माेठी ग्रामपंचायत असलेल्या वाघाेली गावाचा आता महापालिकेत समावेश हाेत असल्याने या समस्यांचा विषय नव्याने ऐरणीवर आला आहे.
एका बाजूला महापालिकेत समावेश हाेण्याची हीच याेग्य वेळ असल्याचे म्हटले जात आहे तर एका बाजूला समाविष्ट गाव म्हणून वाघाेलीचा वेगळा विचार केला जावा आणि विशेष निधीची तरतूद करावी अशीही मागणी हाेत आहे. सुमारे अडीच लाख लोकसंख्या असलेल्या वाघोली ग्रामपंचायतीचा पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
आयटी हब, शिक्षणाचं माहेरघर, सणसवाडी एमआयडीसी आणि प्रतिष्ठित रांजणगाव एमआयडीसी गावालगत असल्याने वाघोलीला जिल्ह्यात अनन्यसाधारण महत्व आहे. वाघोलीत पिण्याच्या पाण्याची समस्या फार मोठी आहे. गावाला पाणी मिळावे म्हणून ‘वढू योजना’ सुरू केली गेली होती पण आता ती योजनाही अपूरी पडू लागल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावातील सोसायटीत पाण्याचे टँकर सुरू असून तर झोपडपट्टी वस्तीत हंडाभर पाण्यासाठी नागरिक दारोदार फिरत आहे. भामा-आसखेडच्या पाण्यावरून लोकप्रतिनिधींमध्ये वाद सुरू आहे.
वाघोली ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट आहे. सुरू असलेली कामेही प्रलंबित आहेत. भावडी रस्त्यावर एकावेळी दोन वाहने बसू शकत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. निओ सिटीतील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. मुख्य अहमदनगर रस्त्यावरील प्रचंड वाहतूक कोंडी नेहमीच असते, गावातील अंतर्गत रस्ते खराब असल्याने नागरिकांना याच अवलंबून राहवं लागतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते आणि विशेष म्हणजे वाघोली ग्रामपंचायतीने केवळ रस्त्यांसाठी साठ कोटी रुपये खर्च केलेले आहेत. मग हा पैसा गेला कुठे, असा प्रश्न सामान्य वाघोलीकर विचारत आहेत.
वाघोलीत दररोज शंभर टन कचरा निर्माण होतो. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने अडीच एकर जमीन वाघोलीच्या वेशीबाहेर घेतली. पण प्रत्यक्षात कचरा व्यवस्थापनाचं काम अजून सुरू झालेलं नाही. शहरातील अंतर्गत प्रवासाच्या दृष्टीने सुरू केलेल्या बीआरटी टर्मिनलसाठी अडीच एकर क्षेत्र देण्यात आले पण अजून त्याचं काम सुरू नाही. गावात बारा कोटी रुपयांच्या गटारांची कामं झालेली असून एसटीपीची व्यवस्था अजूनही झालेली नाही.
प्रतिक्रिया
“वाघोलीतील अतिक्रमण हटवण्यासाठी आम्ही वारंवार वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यावर लवकरच कार्यवाही होईल. गेल्या तीन वर्षात ग्रामपंचायतीद्वारे मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली. वाघोलीत आता जेवढा निधी येतो तेवढा पुणे महापालिकेत समावेश झाल्यानंतर येईल का? त्यामुळे आमचा याला विरोध आहे.”
-वसुंधरा शिवदास उबाळे, सरपंच, वाघोली ग्रामपंचायत
चौकट
“पुणे महानगरपालिकेत वाघोलीचा समावेश करायचा असेल तर हीच वेळ चांगली आहे,नंतर फार अडचणी निर्माण होतात.”
-रामभाऊ दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य, पुणे