वाघोली : पहाटेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमध्ये ६ ट्रक जळून खाक झाल्याची घटना उबाळेनगर येथील बाबूभाई गॅरेजमध्ये घडली. या आगीमध्ये ट्रकची बॉडी बांधण्यासाठी लागणारे साहित्य देखील जळून खाक झाले असून, अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने शेजारी उभ्या असलेल्या ९ ट्रक जळण्यापासून वाचविण्यात यश आले आहे.याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महमार्गालगत वाघोली येथील उबाळेनगर परिसरामधे बाबूभाई मिस्त्री यांचे ट्रकची बॉडी बांधणे आणि रिपेयरिंगचे गॅरेज आहे. शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास गॅरेजमध्ये झोपलेल्या प्रशांत जायभाये याला भिंतीच्या कडेने असणाऱ्या पत्र्याच्या शेडला मोठी आग लागली असल्याचे दिसले. त्याने तत्काळ शेजारी आणि मालकाला आगीबाबत कळविले. आगीचे लोट मोठे असल्याने नागरिकांनी अग्निशमन दलाला बोलविले. अग्निशमन दलाचे जवान पोहोचण्यागोदार पत्र्याच्या शेडसमोर असणारे ६ ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी आले होते. आगीच्या झळा वाऱ्याने पसरल्याने चाळीस फुट लांब असणाऱ्या इमारतीचा दरवाजा देखील थोडा जळाला. इमरतीतील सर्व रहिवाशांना सिलिंडरसह खाली करण्यात आले. ५ वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन गाड्यांच्या मदतीने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत दीड तासामध्ये आगीवर नियंत्रण मिळविले. आग विझविताना टँकरची देखील मदत घेण्यात आली. आग आटोक्यात आणण्यात यश आले असले तरी बॉडीचे काम करण्याकरिता आलेले ६ ट्रक पूर्णपणे जळून खाक झाले होते. (वार्ताहर)
वाघोलीत ६ ट्रक खाक
By admin | Published: April 23, 2016 12:53 AM