पुणे : जन्म व मृत्यू घटनाची नोंदणी करण्यासाठी वापण्यात येणारी व केंद्रशासनाने विकसित केलेले सीआरएस प्रणाली ( नागरी नोंदणी पध्दती) सध्या बंद पडली आहे. त्यामुळे ५ एप्रिल पासून जन्म मृत्यू घटनाची नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. परिणामी ही प्रणाली पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत नागरिकांना जन्म मृत्यू दाखल्यांसाठी आता वेट अँड वॉच शिवाय पर्याय उरलेला नाही.
पुणे महापालिका मार्च २०१९ पूर्वी स्वतःचे सॉफ्टवेअर म्हणजेच जन्म मृत्यू नोंदणी प्रणाली वापरून महापालिका हद्दीतील नागरिकांना जन्म मृत्यू दाखले देत होती. मात्र मार्च २०१९ नंतर केंद्रशासनाने विकसित केलेल्या सीआरएस प्रणालीचा वापर सर्व ठिकाणी सुरू झाला. पण ही प्रणाली ५ एप्रिल पासून बंद पडली असून, राज्य शासनाकडून याबाबत केंद्र शासनाच्या तांत्रिक विभागाशी संपर्क करण्यात आलेला आहे.
सदर अडचण दूर करण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याचे तसेच सीआरएस पोर्टल लवकरच सुरु होईल असे केंद्राकडून राज्य शासनाला कळविण्यात आले आहे. परंतु ही प्रणाली पुन्हा कधी सुरू होईल हे निश्चित सांगता येणार नाही. परिणामी मार्च २०१९ नंतरचे जन्म मृत्यू दाखले मिळण्यास नागरिकांना काही काळ वाट पहावी लागणार आहे.