पुणे : गेल्या दोन- तीन दिवसांत पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या उच्चांकी वेगाने वाढत आहे. अशा स्थितीमध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासाठी किमान 15 दिवस वेट अॅण्ड वाॅच चा सल्ला पुण्याच्या टाक्स फार्सने दिला आहे. यामुळेच शाळा सुरू करायच्या किंवा नाही या संदर्भात शनिवार (दि.22) रोजी उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणा-या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने राज्य शासनाने सुरू केलेल्या शाळा पुन्हा बंद केल्या. परंतु राज्यात इतर सर्व गोष्टी सुरू ठेवल्याने शासनावर टीका सुरू झाली. यामुळे येत्या सोमवार (दि. 24) पासून पुन्हा एकदा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात स्थानिक प्रशासनाला अधिकार दिले असून, कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन हा निर्णय घेण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात शनिवारी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. यामध्ये गेल्या तीन-चार दिवसांत शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. येत्या आठ - दहा दिवसांत ही संख्या अधिक वेगाने वाढू शकते. सध्या राज्यात पुणे पुन्हा एकदा कोरोनाचे व्हाॅटस्पोट बनले आहे. अशा परिस्थितीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घाईचा ठरू शकते, असे टाक्स फोर्सचे म्हणणे आहे. यामुळेच सर्व लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून हा निर्णय घेण्यात येणार आहे.
शाळांबाबत निर्णय बैठकीत ठरणार
''शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता शाळा सुरू करण्यासंदर्भात थोडा विचार करावा लागेल. शाळा सुरू करायच्या किंवा कसे याबद्दलची चर्चा शनिवारी( दि.22) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कोरोना आढावा बैठकीत होणार आहे असे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी सांगितले.''