सांगवी (बारामती) : स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉझ’ मशिनच्या तांत्रिक अडचणीमुळे मशीनमधून वारंवार मिळणाऱ्या कृपया 'प्रतीक्षा करे''च्या संदेशने अखेर नागरिकांना रेशन दुकानासमोर दिवसाची रात्र करून धान्य घेण्यासाठी अखेर थंडीत रात्री कुडकुडत बारा ते एक वाजेपर्यंत प्रतीक्षा करण्याची वेळ आणली आहे.
संपूर्ण राज्यात एकाच वेळी होत असणाऱ्या वितरणामुळे दुकानदार व सर्वसामान्य नागरिकाला ई-पॉझ’ मशिनच्या सर्व्हर डाऊनचा सामना करावा लागतो. यामुळे पुणे जिल्ह्यातून ठिकठिकाणी ही दृश्य समोर आली आहेत. शासनाने दिलेल्या कालावधीत धान्य वाटप करावे लागत असल्याने सांगवी ( ता.बारामती) येथे नदीच्या कडेला असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानासमोर नागरिक रात्री बारा वाजेपर्यंत थंडीत कुडकुडत धान्य घेण्यासाठी रांगेत उभे होते.
नियमित पैसे भरून मिळणारे धान्य व शासनाकडून कोरोना काळापासून दिले जाणारे मोफत धान्य तसेच दिवाळी निमित्त गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी वाटप करण्यात आलेल्या आनंदाचा शिधा किट अशा तीन प्रकारचे धान्य मिळविण्यासाठी नागरिकांना तीनदा अंगठे उठवावे लागत आहेत. सर्व्हर डाऊनमुळे एका व्यक्तीला मशीनवर अंगठा ठेऊन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जवळपास अर्धा तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यातही रेशन दुकानदारांकडे असलेल्या ‘ई-पॉझ’ मशिनमध्ये वारंवार अनेक तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने व अखेरच्या दिवसामुळे गरजूंनी थेट रात्री बारा वाजेपर्यंत स्वस्त धान्य दुकाना समोर हजेरी लावली होती.
या सर्व्हर डाऊनमुळे अधिकारी देखील हतबल झाले आहेत. मात्र, याचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाच बसत आहे. वारंवार घडून येणाऱ्या या प्रकाराला आता नागरिक देखील चांगलेच संतापले आहेत. मात्र, मोलमजुरी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना विकतचे धान्य परवडणारे नसते, हातावरचे पोट असणाऱ्या मजुरांना मजुरीच्या दिवसाला लागणारा खडा, फुकटचा वाया जाणारा वेळ यामुळे धान्य वाटप ऑफलाइन करण्याची मागणी होत आहे. अशा घटनेमुळे कधीकधी नागरिकांनी स्वस्त धान्य दुकानदार यांनाच शिवीगाळ केल्याचे देखील अनेक प्रकार समोर आले आहेत.
त्यामुळे ग्राहकांना वेळेवर धान्य देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. अंगठा ठेवल्यावर ई-पॉझ’ मशिनच्या स्क्रीनवर केवळ ‘प्रतीक्षा करे’ असाच संदेश दिला जात आहे. त्यामुळे वेळेवर वितरण होत नसल्याने नियमित मालाचे ‘ऑफलाइन’ वाटप करण्याची नागरिकांमधून मागणी होत आहे.