पुणे: पुणे शहरात बुधवारपासून १८ वर्षांवरील पुढील नागरिकांसाठी मोफत लसीकरण सुरु होणार आहे. आज लसीकरणाच्या नियोजनाची सर्व अंमलबजावणी होईल. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. अनेक दिवसांपासून तरुण वर्ग या दिवसाची वाट बघत होते. या आनंदाच्या बातमीने तरुणांना दिलासा मिळणार आहे.
पुणे शहरामध्ये शनिवारपासून ३० वर्षांवरील नागरिकांचे मोफत लसीकरण शहरातील विविध केंद्रांवर चालू झाले आहे. परंतु केंद्र सरकारकडून पुरवठा अपुरा होत असल्याने १८ ते ४४ या वयोगटाचे मोफत लसीकरण जवळपास महिनाभर बंद होते. तर खाजगी रुग्णालयात अठरा वयाच्या पुढील नागरिकांचे सशुल्क लसीकरण केले जात आहे. तरुण वर्ग व्यवसाय, नोकरी, शिक्षण यासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असताना त्यांचे लसीकरण केले जात नव्हते.
केंद्र सरकारने आज पासून देशात १८ ते ४४ या वयोगटासाठी लस पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे महापालिका उद्यापासून लसीकरण सुरू होईल. याबाबतचे सविस्तर नियोजन आज जाहीर होणार असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटर वरून सांगितले आहे.
मागील दोन महिन्यात दुसऱ्या लाटेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशाच परिस्थितीत सर्वत्र लसींचा तुटवडा जाणवू लागला होता. त्यामध्येही केंद्राने टप्प्याटप्याने लसीकरणाला सुरुवात केली. नागरिक लस घेण्यासाठी धडपडही करत होते. पण तरुण वर्गाला वयोगटानुसार प्रतीक्षा करावी लागणार होती. आता ती वाट पाहण्याची वेळ संपली असून १८ वर्षांवरील सर्वांनाच लस घेता येणार आहे.