पुणे : यंदाच्या वर्षी पहिली, आठवी व दहावी या तीन इयत्तांच्या अभ्यासक्रमांमध्ये बदल होणार आहे, त्यापैकी दहावीची सुधारित अभ्यासक्रमाची पुस्तके बाजारात उपलब्ध झाली आहेत. पहिली व आठवीच्या नवीन पुस्तकांची मात्र शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.दहावीची पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर सुधारित अभ्यासक्रमानुसार विषयनिहाय शिक्षकांच्या प्रशिक्षणालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर दहावीचे वर्ग लगेच सुरू करता येणे शक्य आहे. पहिली व आठवीची पुस्तके उपलब्ध होण्यास विलंब झाला आहे. पुस्तके आल्यानंतर शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम पार पाडावा लागणार आहे. राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून (बालभारती) पहिलीच्या सुधारित अभ्यासक्रमाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आठवीची पुस्तके छपाईसाठी पाठविण्यात आल्याचे समजते. ही पुस्तके उपलब्ध होण्यास विलंब झाल्यास शाळेतील वर्गामध्ये शिकविणे सुरू करण्यासही उशीर होणार आहे. त्यामुळे पुस्तके उपलब्ध करण्याची कार्यवाही लवकर पूर्ण करण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.इयत्ता दहावीचे वर्ष हे महत्त्वाचे वर्ष असल्याने बालभारतीकडून इयत्ता दहावीची पुस्तके एप्रिल महिन्यातच प्रकाशित करण्यात आली. मात्र आठवी व पहिल्याच्या पुस्तकांना मात्र विलंब लावण्यात आला आहे. मागील वर्षी इयत्ता सातवी व नववीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला. पुढील वर्षी दुसरी, तिसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे.
पहिली, आठवीच्या पुस्तकांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 1:41 AM