पुणे: आपल्या सिद्धहस्त लेखणीतून ’गीतरामायण’ अजरामर करणारे गजानन दिगंबर माडगूळकर उर्फ गदिमा यांच्या पुण्यातील स्मारक उभारणीला अखेर मुहूर्त साधला. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन आज (दि २२) सकाळी ९ वाजता माडगूळकर कुटुंबियांसह केवळ २५ जणांच्या उपस्थितीत स्मारकाच्या कोथरूड येथील नियोजित जागेवर छोटी पूजा करून गदिमांच्या स्मारकाच्या कामाचा श्रीगणेशा होणार आहे.यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
महापौर म्हणाले, पुण्यात गदिमांचे स्मारक होण्यासाठी गदिमांच्या कुटुंबियांनी अनेक वर्षे लढा दिला. त्याला आता खऱ्या अर्थाने यश आले आहे. गदिमा यांचे स्मारक होण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी सातत्याने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर कोथरूडच्या महात्मा फुले सोसायटीमध्ये स्मारकासाठी जागा देण्यात आली आज छोट्या स्वरूपात गदिमा यांच्या स्मारकाचा भूमिपूजन समारंभ आपण करत आहोत. खरंतर साहित्य क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या एका प्रतिभावंत लेखकाच्या स्मारकाचा कार्यक्रम भव्यदिव्य स्वरूपात करायचा होता. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम आपण मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करत आहोत. आगामी दोन वर्षात हे स्मारक उभे करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
महापौरांनी आश्वासन दिल्याप्रमाणे स्मारकाचा भूमीपूजन सोहळाफेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणार होता. मात्र कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरूवात केली. त्यामुळे महापौरांनी स्मारकाच्या भूमिपूजन सोहळा पुढे ढकलला. केवळ छोटेखानी कार्यक्रमातून स्मारकाच्या कामाला सुरुवात करू असे महापौरांकडून गदिमा कुटुंबियांना सांगण्यात आले.
सध्या गदिमा यांच्या स्मारकाचे काम सुरू होणे हे जास्त महत्वाचे आहे. खरंतर गदिमा प्रेमींच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम घेऊन काम सुरू करण्याची इच्छा होती मात्र, कोरोना संसगार्मुळे छोट्या प्रमाणात कार्यक्रम करावा लागत आहे. पुण्यात गदिमांचे आदर्श स्मारक उभारून ही वास्तू पुण्याची शान ठरावी असे गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी सांगितले.----------------------------------------------