पुणे : पुणेमेट्रो काही मार्गांवर सुरु झाल्यापासून अनेक विनोदी किस्से घडू लागले. पुण्यात अजूनही मेट्रो परिपूर्ण धावत नसल्याने नागरिक त्यातून फक्त फिरण्याचा आनंद घेत होते. सुट्टीच्या दिवशी तर अनेक कुटुंब मेट्रोने फिरताना दिसून येत होते. परंतु नरेंद्र मोदींनी दोन विस्तारित मार्गांचे उदघाटन केल्यावर अनेकांनी मेट्रोने कामानिमित्त प्रवास करण्यास सुरुवात केली. तसेच मेट्रो प्रशासनाकडून गाड्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. अशातच पुन्हा एकदा मेट्रोबाबतीत एक विनोदी किस्सा समोर आला आहे. एसटी किंवा बस स्टॉपवरून सुटल्यावर लोकं ज्याप्रमाणे थांबवतात. त्याप्रमाणे मेट्रो स्टेशनवरून निघाल्यावर थांबा थांबा म्हणत एका व्यक्तीने थेट मेट्रो थांबवली असून दरवाजा उघडण्याची विनंती केली आहे.
एक ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले होते. त्यांनी दगडूशेठचे दर्शन घेऊन मेट्रो, आवास योजना अशा प्रकल्पांचे उदघाटन केले. त्यानंतर दोन विस्तारित मार्गावरून मेट्रो धावण्यास सुरुवात झाली. सद्यस्थितीत नागरिकांचा मेट्रोला चांगलाच प्रतिसाद दिसून येत आहे. त्यातच मेट्रो थांबवण्याचा विनोदी किस्सा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ट्विटरवरून पुणे सिटी लाईफ या पेजवरून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमधून एक व्यक्ती घाईघाईत मेट्रो स्थानकावर येते. ड्रायव्हरच्या केबीनकडे जाऊन केबीनचे दार वाजवून उघडण्याची विनंती करते. त्यावेळी मेट्रोचालक तातडीने दारं उघडतात आणि व्यक्ती मेट्रोत बसतो. तर दुसरा एक व्यक्तीसुद्धा उशीर झाला असताना घाईघाईत निघालेल्या मेट्रोला हात करून दरवाजे उघडण्याची विनंती करतो आणि नंतर बसून प्रवास करतो.