पुण्यात प्रचारासाठी काँग्रेसला देशपातळीवरील नेत्यांची प्रतिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 08:29 PM2019-04-15T20:29:09+5:302019-04-15T20:31:32+5:30
प्रियांका गांधी, शत्रुघ्न सिन्हा, महंमद अझरूद्दीन, नवज्योतसिंग सिध्दु यांचा रोड शो, तर शत्रुघ्न सिन्हा, सचिन पायलट, ज्योतिरादित्य सिंधिया, अशोक गेहलोत आदी नेत्यांच्या सभांसाठी मागणी करण्यात आली आहे.
पुणे : प्रचारासाठी आता केवळ सहा दिवस उरलेले असताना काँग्रेसला देशपातळीवरील नेत्यांची प्रतिक्षा आहे. शहर काँग्रेसकडून प्रचारासाठी नेत्यांची यादी पाठविली असली तरी अद्याप एकाही नेत्याचे नाव अंतिम झालेले नाही. सध्या प्रचारासाठी पदयात्रा, कोपरा सभा आणि भेटीगाठींवरच भर दिला जात आहे.
येत्या रविवारी (दि. २१) प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. केवळ सहा दिवस राहिल्याने उमेदवारांकडून मतदारसंघ पिंजून काढला जात आहे. प्रामुख्याने थेट मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांकडून चढाओढ सुरू आहे. त्यासाठी पदयात्रा काढल्या जात आहेत. निवडणुकांमध्ये सभांनाही प्राधान्य दिले जाते. काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारासाठी शहरात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील या दोघांची प्रत्येकी एक सभा झाली आहे. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले आहे. तसेच लोकशाहीवादी संघटनांनी आयोजित केलेल्या मेळाव्यालाही चव्हाण यांनी हजेरी लावली. मात्र, याव्यतिरिक्त राज्य व देशपातळीवरील नेत्यांची काँग्रेसला अद्याप प्रतिक्षा आहे.
शहर काँग्रेसकडून काही दिवसांपुर्वीच प्रचारकांची यादी प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आली आहे. त्यामध्ये प्रियांका गांधी, शत्रुघ्न सिन्हा, महंमद अझरूद्दीन, नवज्योतसिंग सिध्दु यांचा रोड शो, तर शत्रुघ्न सिन्हा, सचिन पायलट, ज्योतिरादित्य सिंधिया, अशोक गेहलोत आदी नेत्यांच्या सभांसाठी मागणी करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपुर्वीच पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यामुळे त्यांची सभा होणार नाही. देशभरात सर्वत्र निवडणुका सुरू असल्याने स्टार प्रचारकांना प्रत्येक मतदारसंघात जाणे शक्य होत नाही. त्यामुळे ४८ तास आधी त्यांच्या सभेचा दिवस समजतो. सोमवारपर्यंत कोणत्याही नेत्याच्या सभेचे नियोजन अंतिम झालेले नाही. सध्या स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांमार्फत कोपरा सभांमधून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. दररोज तीन-चार कोपरा सभा घेतल्या जात आहेत. शेवटच्या तीन-चार दिवसांत नेत्यांच्या सभा होतील. याबाबत एक-दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.