देवराम भेगडे, किवळेदेहूरोड येथील बुद्धविहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते २५ डिसेंबर १९५४ रोजी त्यांनी ब्रम्हदेशातील रंगून येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्या ऐतिहासिक घटनेला गुरुवारी साठ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, धम्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील ऐतिहासिक बुद्धविहाराच्या डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा विस्तार व विकास करण्यासाठी शासनस्तरावर तसेच स्थानिक पातळीवर होणारे प्रयत्न तोकडे पडत असल्याची भावना अनेक बौद्धबांधव व्यक्त करीत आहेत. डॉ. आंबेडकर यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना २५ डिसेंबर १९५४ रोजी करण्यात आली. १२०० वर्षांनंतर भगवान बुद्धाच्या मूर्तीची स्थापना करण्याचा पहिला मान पुण्यानजीक असणाऱ्या छोट्याशा देहूरोड गावाला मिळाला असल्याचे डॉ. आंबेडकर यांनी त्यावेळी झालेल्या भाषणात नमूद केले होते. या वेळी शंकरराव खरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते. बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना समारंभाला ४० हजाराहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता. स्थानिक कार्यकर्ते दिवंगत लक्ष्मण रोकडे, हरीश चौरे उपस्थित होते. त्यावेळी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड ही स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नव्हती.यावेळी उपस्थित अनुयायांना मार्गदर्शन करताना डॉ. आंबेडकर यांनी, हे जे देऊळ बांधण्यात आले आहे, ते अत्यंत छोटे आहे. ते जर आपण आहे त्या स्थितीत ठेवाल तर आपल्याला काळिमा लागेल. या देवळाला एक हॉल पाहिजे. प्रदक्षिणा करण्यासाठी जागा हवी आहे. तुम्ही सर्वांनी वर्गणी गोळा करून या मंदिराला भव्य स्वरूप देण्याचा प्रयत्न करावा. मात्र भगवंताच्या नावावर जमा केलेला पैसा खाऊ नका, असा सल्ला दिला होता. आजचा प्रसंग इतिहासात नोंदला जाईल. बाराशे वषार्नंतर भगवान बुद्धाच्या मूतीर्ची स्थापना करण्याचा पहिला मान आपल्याला मिळाला आहे. याचे सारे श्रेय आपल्यालाच आहे, म्हणून आपण धन्यता मानली पाहिजे, असे डॉ.आंबेडकरांनी म्हटले होते.
धम्मभूमीस विकासाची प्रतीक्षा
By admin | Published: December 25, 2014 4:58 AM