चाकण : सतत बदलणाऱ्या नियमांमुळे शहरातील व्यवसायांची आणि दुकानदारीची पार वाट लागली आहे. लहान-मोठे व्यवसाय मोडकळीस आल्याने घर चालवणे कठीण झाले आहे. कर्जाचे हप्ते थकल्याने बँकांचा तगादा सुरू झाल्याने अनेक दुकानदार दुकाने बंद ठेवण्यास आता विरोध करू लागले आहेत. दररोज समोर येणाऱ्या नव्या निर्बंधांमुळे शहरातील अनेक दुकानदार आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे.
पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये वेगळे नियम आणि ग्रामीण भागात वेगळे नियम त्यामुळे सरसकट दुकाने सुरू ठेवण्यास नागरिकांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आता कडक कारवाईचा दंडुका उगारला असून उशिरापर्यंत दुकाने सुरू असलेल्या अनेकांवर दंडात्मक कारवाया सुरू केल्या आहेत. चाकणमधील काही स्थानिक दुकानदार नागरिकांवर थेट सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाल्याने हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्रशासनाच्या वेगवेगळ्या आदेशांची माहिती नसल्याने सर्व काही खुले असल्याच्या भावनेतून सर्रास दुकाने शनिवार आणि रविवारी उघडी ठेवली जात असल्याने अशा कारवायांचा त्रास शहरातील अनेक दुकानदारांना होऊ लागला आहे. मागील दिवसांपासून अनेक व्यावसायिकांवर पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्याच्या कारवाया केल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाच्या संदिग्ध धोरणाबाबत आणि पालिका व पोलिसांच्या कठोर कारवायांच्या बाबत नागरिकांमधून भीती व्यक्त होत आहे.
वीकेंड लॉकडाऊनच्या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असताना दुकाने सुरू असल्याने पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी वीकेंड लॉकडाऊन असल्याबाबत सांगितल्यानंतर संबंधित दुकानदाराने हुज्जत घातल्याने थेट सरकारी कामात अडथळा आणि अटकेची कारवाई झाल्याने चाकणमधील अनेक दुकानदार आणि व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
शहरातील सर्वच प्रकारची दुकाने बंद करण्यात येत आहेत. कारण कोरोनाचा प्रसार होत आहे मग शहरातील अवैध प्रवासी वाहतूक आणि व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू असूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप व्यवसायिकांनी केला आहे.