अनलॉकमध्ये आरटीओ कार्यालये सुरू झाल्यानंतर सुरूवातीला शिकाऊ व पक्का परवाना चाचण्या बंद होत्या. टप्प्याटप्याने या चाचण्या सुरू केल्या. आता या चाचण्या पूर्ण क्षमतेने होत आहेत. लॉकडाऊन काळात रखडलेल्या चाचण्यांमुळे दैनंदिन कोट्यामध्येही वाढ केली. शिकाऊ परवान्याचा सर्वाधिक कोटा पुणे कार्यालयात आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी सकाळी साडे सात वाजल्यापासून चाचणी घेणारे पुणे देशातील पहिले कार्यालय ठरले आहे. सकाळी साडे सात ते सायंकाळी ६ या कालावधीत दर दीड तासाला १०० याप्रमाणे सुमारे ७०० जणांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. दररोज वेळ मिळत असल्याने वाहन चालकांना अपॉईंटमेंटसाठी वाट पाहावी लागत नाही.
दुचाकीच्या पक्का परवानासाठीही दोन दिवसांत वेळ मिळत आहे. चारचाकी वाहनांसाठी परवाना मिळविण्यासाठी चाचणी द्यायची असल्यास मात्र १५ दिवसांचा कालावधी लागत आहे. या चाचणीसाठी भोसरी व आळंदी येथे ट्रॅक आहे. पण त्याला मर्यादा असल्याने कालावधी जास्त लागत आहे.
--
परवाना दैनंदिन कोटा अपॉईंटमेंट कालावधी
शिकाऊ परवाना ७०० १ दिवस
दुचाकी पक्का परवाना ३०० २ दिवस
चारचाकी पक्का परवाना २४० १५ दिवस
---
कोरोना काळात गर्दी होऊ नये, तसेच परवाना मिळण्याचा कालावधीही वाढू नये म्हणून उपाययोजना केल्या. शिकाऊ परवान्यासाठी सकाळी साडे सात वाजता चाचण्या सुरू केल्या. त्यामुळे तो कालावधी शुन्यावर आला. तसेच पक्का परवाना चाचणीचा कालावधीही कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. चारचाकीसाठीच्या पक्का परवान्यासाठीचा कालावधीही फार नाही. पण हा कालावधी कमी करण्यासाठीही प्रयत्न केले जातील.
- अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
--
मास्कचा वापर, डिस्टन्सिंगचे कोडे
आरटीओ कार्यालयामध्ये बहुतेक जणांकडून मास्कचा वापर केला जात असल्याचे चित्र आहे. पण फिजिकल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष होताना दिसते. कार्यालयात येणाºया नागरिकांकडून विविध सुविधा खिडक्यांसमोर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. तसेच शिकाऊ परवान्याच्या ठिकाणीही काही प्रमाणात त्याचे उल्लंघन होताना दिसते.