पुणे : मुंबई, ठाणे महापालिकांसाठी जाहीरनाम्यात ५०० स्केअर फुटांच्या आतील घरांना मिळकतकर माफ करण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. त्यानंतर इतर राजकीय पक्षांकडून आम्हीही मुंबईत मिळकतकर माफ करू, असे सांगितले जात आहे. पुणे महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस वगळता अजून इतर पक्षांच्या जाहीरनाम्यांची घोषणा व्हायची आहे, त्यामुळे पुणे शहरातीलही छोट्या घरांच्या मिळकतकर माफीचीही घोषणा होणार का, याची प्रतीक्षा पुणेकरांना लागली आहे.निवडणुकांच्या पार्र्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून लोकप्रिय घोषणा, आश्वासने यांचा पाऊस पाडला जातो. सत्तेवर आल्यानंतर यातील काही आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न होतो, तर काही आश्वासने हवेतच विरून जातात. मात्र, निवडणुकीच्या महासंग्रामात या आश्वासनांना खूप महत्त्व असते, अनेकदा या आश्वासनांवर विश्वास ठेऊन मतदान झाल्याचे यापूर्वीच्या काही निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. काँग्रेस, शिवसेना, मनसे, रिपाइं या पक्षांचा जाहीरनामा अजून प्रकाशित करण्यात आलेला नाही. शिवसेनेने मुंबई, ठाण्यामध्ये छोट्या घरांचा मिळकतकर माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. (प्रतिनिधी)
मिळकतकर माफी घोषणेची प्रतीक्षा
By admin | Published: January 24, 2017 2:11 AM