प्रतिक्षा आता संपली, गणरायाची स्वारी आली...! प्राणप्रतिष्ठापनेसाठी दुपारी दीडपर्यंत उत्तम मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 08:40 PM2018-09-12T20:40:10+5:302018-09-12T20:54:44+5:30
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांकडून पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना व पूजन केले जाणार आहे.
पुणे : रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट, सुगंधी - धुप अगरबत्यांचा दरवळ, मंगलमयी वाद्यांची सुरावट आणि लक्ष वेधून घेणारी आरास अशा प्रसन्नशील चैतन्यदायी वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. याकरिता अवघी पुण्यनगरी तयार झाली असून प्रत्येकाला बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेचे वेध लागले आहेत. शहरातील प्रमुख मंडळाची तयारी पूर्ण झाली असून अनेकांकडून अखेरचा हात फिरविण्याचे काम सुरु होते. कार्यकर्त्यांनी उरलेल्या कामे पूर्णत्वाला नेण्याकरिता वेगाने काम सुरु केल्याचे दृश्य बुधवारी पाहवयास मिळाले.
श्री कसबा गणपती मंडळ, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ, श्री गुरुजी तालीम मंडळ, श्री तुळशी बाग मंडळ व केसरीवाडा गणेशोत्सव या मानाच्या पाचही गणपतींची प्राणप्रतिष्ठा दुपारी बारापर्यंत होणार आहे. यानंतर शहरातील प्रमुख गणेशमंडळांच्या मिरवणूकांना सुरुवात होणार आहे. आकर्षक,सुंदर फुलांनी सजवलेले रथ, त्यात केलेली सजावट , श्रींकरिता तयार केलेले मखर, याशिवाय ढोल, लेझीम झांज पथकांच्या समवेत निघणा-या मिरवणूका गणेशभक्तांच्या उत्सुकतेचा विषय बनला आहे. छत्रपती राजाराम मंडळाच्या मिरवणूकीला दुपारी चार वाजता सुरुवात होणार असून त्यांनी श्रींच्या मिरवणूकीकरिता लक्ष्मी रथाची निर्मिती केली आहे. वाद्यवृंद ढोलपथकाचे वादन होणार असून सायंकाळी सात वाजता पालकमंत्री गिरीश बापट व सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर यांनी सांगितले.
हुतात्मा बाबु गेनु मंडळाच्या श्रींच्या मिरवणूकीला सकाळी नऊ वाजता सुरुवात होणार असून साडेअकरा वाजता प्राणप्रतिष्ठा होणार आहे. फुलांची आकर्षक सजावट असलेला रथ मिरवणूकीचे वेगळेपण असणार आहे. बाबु गेनु चौकापासून मिरवणूकीला सुरुवात होणार असून पुढे मंडई, शनिपार चौक, लक्ष्मी रस्ता, गुरुजी तालीम बेलबाग, रामेश्वर चौकातून श्रींची मिरवणूक पुन्हा नियोजित स्थळी येणार आहे.
* खरेदी आटोपली, सजावट झाली...
बाजारपेठांमधील खरेदीकरिता गर्दी बुधवारी कायम होती. अनेकांनी वाहतूक कोंडी टाळण्याकरिता उत्सवाच्या आदल्यादिवशीच श्रींची मुर्ती घरी घेवून जाण्यास पसंती दिली. उत्सुकता, उत्साह, आतुरतेचे वातावरण उत्सवाच्या पूर्वेसंध्येला पाहवयास मिळाला. वादनाकरिता तयार असलेली ढोलपथके, लेझीमपथके, झांजपथके यांची तयारी पूर्ण होवून आता वादकांना गणरायाच्या स्वारीचे वेध लागले आहेत. सुख, शांती,समृध्दी आणि मांगल्याचे प्रतिक असलेल्या विघ्नहर्ता श्रीगणेशाचे उद्या ( गुरूवारी) भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थी आगमन होत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली असून, घरोघरी व गणेशमंडळांच्या सजावटीच्या तयारीने वेग घेतला आहे. यंदाचा गणेशोत्सव हा अकरा दिवसांचा आहे. गणेश चतुर्थीला पहाटे ब्राह्म मुहूर्तापासून दुपारी दीड वाजेपर्यंत श्रीगणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी उत्तम मुहूर्त असल्याची माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांकडून पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना व पूजन केले जाणार आहे. या दिवशी सूर्योदयापासून दुपारी २:५२ पर्यंत भद्रा आहे. श्रीगणेश स्थापनेसाठी भद्रा दोष मानू नये. पहाटेपासून ते दीड वाजेपर्यंत आपल्या आणि गुरूजींच्या सोयीनुसार कोणत्याही वेळी मंगलमूर्ती मोरया... च्या जयघोषात घरातील श्रीगणेशाची स्थापना करून पूजन करावे.
आपल्या घरी जितके दिवस उत्सव असेल तितके दिवस सकाळी पूजा व रात्री आरती मंत्रपुष्प केल्याने घरामध्ये प्रसन्नता येते, घरातील मूर्ती सुमारे एक वीत म्हणजे ७/८ इंच उंचीची असावी, ही मूर्ती आसनस्थ आणि सुबक असावी तसेच मातीची अथवा शाडूची असावी, असे दाते म्हणाले.