शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती तालुक्यात होते. रसिकलाल धारिवाल फाउंडेशन आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या माध्यमातून वढाणे येथील गावठाण तलावात बंद पाईपलाईनद्वारे आणलेल्या जनाईच्या पाण्याचे जलपूजन पवार यांनी केले. याप्रसंगी रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा धारिवाल, जनाई योजनेचे अधीक्षक अभियंता संजय चोपडे, पाठबंधारे विभागाचे अधिकारी, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संभाजी होळकर, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, मागील ५० वर्षांपासून कुटुंब नियोजनाचा शरद पवारांनी धडा घालून दिला आहे. मात्र, मी एक कुटुंब एक मूल म्हणणार नाही; पण किमान दोन मुलांवर तरी थांबले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. बारामती तालुकाच्या भाग हा अवर्षण प्रवर्षण क्षेत्रात येत असल्याने पावसाचे प्रमाण कमी असते. जनाईचे पाणी वढाणे तलावात सोडण्याची गेली अनेक दिवसांची मागणी होती. त्यामुळे रसिकलाल धारिवाल फाउंडेशन या संस्थेला बंद पाईपद्वारे वढाणे तलावात पाणी आणण्याबाबत चर्चा केली. त्यानुसार या फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा धारिवाल यांनी ४० लाख तर, कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून २५ लाख मिळून ६५ लाख खर्चाची ८०० मीटर लांबीची बंद पाईपलाईन वढाणे तलावापर्यंत करण्यात आली.
या पाईपलाईनद्वारे आलेल्या पाण्याचे जलपूजन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, हे पाणी फुकट न वापरता विजेचे बिल भरण्यात यावे, असे पवार यांनी सांगितले. या वेळी सुप्यासह तालुक्यात होणाऱ्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी सुमारे ३५० कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यापुढे महिला पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन दिसणार नाहीत. सुप्यासह तालुक्यात विविध विकासकामे राबविली जात आहेत. सुप्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, यापुढे नागरिकांना मनमानी बांधकामे करता येणार नाहीत, असे पवार यांनी सांगितले.
२८सुपे
वढाणे येथील तलावात सोडण्यात आलेल्या जनाईच्या पाण्याचे जलपूजनप्रसंगी उपस्थित असलेले अजित पवार व इतर.