कोरोना चाचणीत २३ जण निघाले ‘पॉझिटीव्ह’
कळस : वालचंदनगर पोलिसांनी नाकाबंदी करून रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्यांना १४८ जणांना ताब्यात घेऊन त्यांची कोरोनाची चाचणी केली. त्या वेळी तब्बल २३ जण कोरोनाबाधित निघाले.
वालचंदनगर पोलिसांनी गेल्या आठवड्यापासून संचारबंदीचे उल्लंघन केलेल्या अनेक दुकानदारांची सात दिवस दुकाने सील केली आहेत. सोमवारी इंदापूर-बारामती रस्त्यावर नाकाबंदी केली भवानीनगर पासून गोतंडीपर्यंत बारामती-इंदापूर रस्त्यावर व निरवांगीपासून जंक्शनपर्यंत प्रवाशांची चौकशी करण्यात येत होती. यामध्ये विनाकारण फिरणारे अनेकजण आढळून आले, त्यांची सक्तीने कोरोना चाचणी करण्यात आली. जंक्शन येथील आरोग्य विभागाच्या मदतीने केलेल्या रॅपिड अँटिजेन तपासणीमध्ये त्या १४८ जणांपैकी तब्बल २३ जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि उपचारासाठी कोविड सेंटर मध्ये रवानगी करण्यात आली आहे.
इंदापूरचे प्रभारी तहसीलदार अनिल ठोंबरे, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निमगाव केतकी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद अरकीले, पोलीस हवालदार लक्ष्मण साळवे,मोहन ठोंबरे,प्रकाश माने प्रभाकर बनकर, गुलाबराव पाटील व सर्व सहकाऱ्यांनी ही मोहीम राबवली.
——————————————————