पुणे : दिवस रविवार... वेळ दुपारी साडेचारची...शहाराच्या वर्दळीच्या भागात पोलीस कर्मचाऱ्यांना एक पाकीट मिळाले. त्यात रोख रकमेसह महत्वाची कागदपत्रेही होती. अखेर मूळमालकाला फोन करून त्यांनी पाकीट परत केले. याबद्दल या दोन प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे पोलीस दलासह सर्वानीच कौतुक केले आहे.
याबाबत घडलेली घटना अशी की, रविवारी वाहतूक शाखेचे उपायुक्त असलेल्या वाहनावर चालक म्हणून काम करणारे पोलीस अहवालदार ज्ञानेश्वर लोंढे आणि पोलीस शिपाई अजय कदम हे दोघेजण वाहतूक शाखेच्या कार्यालयाकडे परतत होते. वाटेत त्यांना रस्त्यावर काळ्या रंगाचे पाकीट पडलेले आढळले. त्यांनी आजूबाजूच्या दुकानदारांकडे चौकशी करूनही मूळ मालकाचा शोध न लागल्याने त्यांनी आतल्या व्हिजिटिंग कार्डवरील क्रमांकावर फोन केला. तो फोन उच्च न्यायालयात वकील व्यवसाय करणारे मनोज गडकरी यांना लागला. ते नानापेठ भागातच असल्याने त्यांनी स्वतः येऊन, ओळख पटवून पाकीट परत नेले. या पाकिटात पंचवीस हजार रुपये, बँकेचे एटीएम कार्ड, क्रेडीट कार्ड अशी महत्वाची कागदपत्रे होती. त्यांना पाकीट परत केल्यावर त्यांनी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या प्रकाराबद्दल वाहतूक पोलीस आयुक्तांनी या कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.