राजू इनामदारपुणे : रस्त्यावर भीक मागत फिरणाऱ्या त्या सात वर्षांच्या मुलाकडे पाहून त्याचे मन द्रवले, यांचे भविष्य काय असा प्रश्न त्याला पडला. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे उत्तर मिळाले व स्वत:च त्यांना शिक्षण द्यायचे असा विचार केला. त्याच्या या विचाराला आता १२० जणांची साथ तर मिळालीच, शिवाय त्यापासून प्रेरणा घेत थेट उत्तर प्रदेशातील कानपूर व राज्यात सिंधुदुर्गमध्येही काही युवकांनी हा उपक्रम सुरू केला आहे.अभिजित पोखर्णीकर याच्या प्रयत्नामुळे आज अनेक निराधारांना किमान लिहिता वाचता येईल इतके शिक्षण मिळत आहे. त्याला शुभम माने, वैभव काचले व अशाच अनेकांची सक्रिय साथ मिळते आहे. त्यातून पुण्यात विश्रांतवाडी, शिवाजीनगर, टिळेकरनगर, मार्केटयार्ड, पाषाण, पिरंगुट या ठिकाणी रोज रस्त्यावरच्या शाळा भरू लागल्या आहेत. मुलांना तिथे अक्षरओळख करून दिली जाते. गणित शिकविले जाते. वाचनाचे पाठ दिले जातात.यासाठीच्या साहित्याचा खर्च अभिजित, शुभम, वैभव स्वत: करतात. काही जणांकडून साहित्याच्या स्वरूपात मदत घेतली जाते. आर्थिक देणग्या घेणे त्यांनी पूर्णत: टाळले आहे. समविचारी मुले त्यांना येऊन मिळत आहेत. त्यामुळेच आता अशी शाळा घेणाऱ्यांची संख्या १२० झाली आहे. त्यात मुलीही आहेत. काही ठिकाणी सकाळी १० ते १२, तर काही ठिकाणी दुपारी ४ ते ६ अशी शाळा चालविली जाते. ७ ते १७ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींचा त्यात समावेश आहे.
आणखी शाळा सुरू करणारकानपूरमधील काही मुले पुण्यात आली असताना त्यांना या उपक्रमाची माहिती मिळाली. त्यांनी प्रेरणा घेत कानपूरमध्ये हा प्रयोग सुरू केला व यशस्वीही केला. सिंधुदुर्गमध्येही आता याची सुरुवात झाली. हे सगळे एकमेकांच्या संपर्कात असतात. पुण्यातच आता आणखी काही वस्त्यांमध्ये अशी शाळा सुरू करण्याचा अभिजित आणि त्याच्या मित्रांचा विचार आहे.