लॉकडाऊन मध्ये बंद असणाऱ्या शाळा आणि त्यामुळे होणारं नुकसान हा आता काळजीचा मुद्दा ठरला आहे.त्यातच जिथे नेटवर्क आहे तिथे किमान ऑनलाईन अभ्यास तरी सुरू आहे. पण ग्रामीण भागात जिथे नेटवर्क नाही आणि शाळाही बंद तिथे नेमकं काय करायचं हा प्रश्न आहे. याच प्रश्नावर उत्तर शोधलं आहे ते भोर तालुक्यातल्या म्हाळवाडी गावातल्या तरुणांनी. या तरुणांनी एक भन्नाट कल्पना शोधली. त्यांनी अख्ख्या गावाचीच शाळा बनवली.
"मुलं शाळेत जात नसल्यामुळे त्यांचं नुकसान होतंय हे दिसत होतं. पण यावर पर्याय काय हे सुचत नव्हतं.मग विचार केला की शाळेतल्या भिंतींसारखे जर घरांचा भिंतींवर धडे लिहिले तर? गावातल्या सगळ्या लोकांनीच ही संकल्पना उचलून धरली. मग शिक्षकांशी चर्चा झाली आणि मग काय काय रंगवायचं ते ठरवलं. त्यानंतर गावातले पेंटर पुढे आले. आणि मग सुरू झालं ते भिंती रंगवणं "या सगळ्या साठी पुढाकार घेणारे राजेश बोडखे सांगत होते.
या सगळ्याला येणार लाख दीड लाखांचा खर्च देखील बोडखेनी उचलला. आणि मग घरांचा भिंती रंगल्या विज्ञान गणित इतिहास भुगोलापासून ते अगदी फोनेटिक्स पर्यंत अनेक धडे भिंतींवर रंगले आहेत. गावातल्या जवळपास 85 घरांचा भिंती आता या रंगात रंगल्या आहेत.
शिक्षकांना सुद्धा या प्रकल्पाचा खूप फायदा झाला आहे.या शाळेत शिक्षक असणारे गणेश बोरसे म्हणाले "इथे गावात नेटवर्क ची अडचण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला अडचण येत होती.आम्ही मुलांकडे जायचो पण त्यात दिवसाला पाच ते सहा मुलं कव्हर व्हायची. त्यामुळे जेव्हा ही संकल्पना पुढे आली तेव्हा पाढे, काही धडे, असा सगळं रंगवून घेतलं. बेस तयार असेल तर पुढचा अभ्यास करणं सोपं जाईल हा यामागचा हेतू होता. या बरोबरच आम्ही अभ्यास मित्र तयार केले आहेत. म्हणजे मोठी मुलं लहान मुलांना शिकवतात. या चित्र आणि अभ्यासमित्रांचा माध्यमातून मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहोत".
एक अभ्यासाचं गाव तर तयार झालंय. पण आता आजूबाजूचा गावांमध्ये ही हा प्रकल्प राबवायचा विचार असल्याचं जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे म्हणाले.एकूणच सध्या अख्खं म्हाळवाडी गावच अभ्यासात रंगलंय.