पुणे : महापालिकेने महामेट्रो कंपनीला वनाज ते चांदणी चौक या मेट्रो मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी पत्र दिले. महामेट्रो आता स्वारगेट ते कात्रज, नाशिक फाटा ते चाकण व पिंपरी-चिंचवड ते निगडी या चार मार्गाच्या प्रकल्प अहवालांचे काम करत आहे. त्यापैकी निगडीपर्यंत मेट्रो नेण्याच्या प्रकल्प अहवालास मंजुरी मिळाली असून, सध्या सुरू असलेल्या कामातच ते काम करण्यात येणार आहे. स्वारगेट ते कात्रज या मार्गाच्या प्रकल्प अहवालाचे पालिकेला लवकरच सादरीकरण करण्यात येणार आहे.महामेट्रो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी ही माहिती दिली. वनाज ते रामवाडी असा मेट्रो मार्ग आहे. मात्र चांदणी चौक येथे महापालिका करणार असलेल्या नियोजित शिवसृष्टीसाठी हा मार्ग चांदणी चौकापर्यंत नेण्याचा प्रस्ताव होता. साधारण सव्वा किलोमीटरचा हा मार्ग आहे. नंतर शिवसृष्टीच वादात सापडल्यामुळे या मार्गाविषयी साशंकता होती, मात्र दीक्षित यांनी महापालिकेने या मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी पत्र दिले असल्याचे स्पष्ट केले.महामेट्रो एकूण चार मार्गांचे प्रकल्प अहवाल तयार करत आहे. त्यातील स्वारगेट ते कात्रज या मार्गाच्या अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्याचे सादरीकरण करण्यात येईल. भुयारी व उन्नत म्हणजे रस्त्यावरून अशा दोन्ही मार्गाचे अभ्यासपूर्ण अहवाल करण्यात आले आहेत. भुयारीसाठी ३ हजार कोटी व उन्नतसाठी अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च येईल. भुयारी मार्ग ६ किलोमीटरचा असेल तर उन्नत मार्ग ८ किलोमीटरचा. त्यातील कोणता मार्ग व्यवहार्य आहे याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, असे दीक्षित यांनी सांगितले.मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ५०० मीटर परिसरात जादा चटईक्षेत्र निर्देशांक देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच या परिसरातील नव्या बांधकामाचे विकसन शुल्क वगैरेंबाबत महामेट्रोला अधिकार देण्यात आले आहेत. उंच इमारती वाढून तिथे लोकसंख्येची घनता वाढली की मेट्रोला प्रवासी मिळतील, अशा हेतूने हे धोरण राबवण्यात येत आहे. त्याशिवाय स्वारगेट, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट या ठिकाणी मेट्रोची मोठी संकुले बांधण्यात येत आहेत. त्यातूनही मेट्रोला उत्पन्न मिळणार आहे, असे दीक्षित म्हणाले.महामेट्रो कंपनीला मेट्रोच्या डब्यांचे उत्पादन करण्यास केंद्र व राज्य सरकारने परवानगी दिली आहे. नागपूर इथे हा कारखाना असेल. मेट्रो मार्गाचे काम करणाऱ्या कंपनीकडून मेट्रोच्या डब्यांची निर्मिती असे उदाहरण जगात प्रथमच महाराष्ट्रात घडेल. एरवी वापरण्यात येणारे डबे चीनकडून येत असले तरी त्यात भारतासह अन्य देशांचेही तंत्रज्ञान त्यात काही प्रमाणात वापरलेले असतेच. महामेट्रो मात्र पूर्ण भारतीय बनावटीचा डबा तयार करेल.- ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो
वनाजपर्यंतची मेट्रो चांदणी चौकापर्यंत जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 3:21 AM