लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला. तिसऱ्या टप्प्यातही ६० वर्षांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांनी तर ४५ ते वयोगटातील नागरिकांनी पहिला डोस घेतला. मात्र यानंतर लसीची उपलब्धता कमी होऊ लागल्याने केवळ ९ टक्केच लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. तर इतरांना लस मिळवण्यासाठी वण वण फिरत असून, कुणी लस देता का लस असे म्हणण्याची वेळ आली आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील शंभर टक्के लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर लसीचा साठा कमी-अधिक प्रमाणात उपलब्ध होऊ लागला. आता तर लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लसीचा दुसरा डोस वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांना लसीसाठी फिरावे लागत आहे.
मार्च २०२० पासून जिल्ह्यासह राज्य आणि देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या आजारावर कोणतेही औषध नसल्यामुळे सुरवातीला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. तब्बल दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर या कोरोनावर प्रतिबंधात्मक लस आली आणि १८ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्कर यांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर, तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षापुढील तर चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांपुढील आजारी तसेच सहव्याधी असलेल्यांना लस देण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार लसीकरण मोहीम सुरू झाली. पहिले दोन महिने लसीकरण सुरळीत सुरू होते. मात्र, जसजसे लसीकरण लाभार्थ्यांची संख्या वाढू लागली, तसे लसीसाठा पुरवठा कमी होऊ लागला. तोपर्यंत जिल्ह्यात लसीकरण केंद्रांची संख्या दोनशेपार गेली होती. हेल्थ आणि फ्रंटलाईन वर्कर यांनी लसीचा पहिला डोस घेतला. हे प्रमाण शंभर टक्के आहे. मात्र, मार्च महिन्यात ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला, त्यांना दुसऱ्या डोससाठी वाट पाहावी लागत आहे. पर्यायाने हेल्थ वर्कर केवळ ५४ टक्के लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला, तर फ्रंटलाईन वर्करमध्ये ६८ टक्के लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. ६० वर्षांपुढील ७८ टक्के लाभार्थ्यांचा पहिला डोस झाला, तर त्यातील केवळ ९ टक्के लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ ते ६० वयोगटातील केवळ ३८ टक्के लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला असून, त्यातील २ टक्के लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे.
चौकट
वेळेत लस न घेतल्यास परिणामकारकता होणार कमी?
जिल्ह्यात कोरोनाची कोव्हॅक्सीन आणि कोविशील्ड लस नागरिकांना दिली जाते. या लसींचे दोन डोस घेणे गरजेचे आहे. दोन डोस घेतल्यावर या लसी परिणामकारक ठरणार आहे. यात कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस हा २८ ते ४२ दिवसानंतर दुसरा डोस घेणे गरजेचे आहे तर कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस ४५ ते ६० दिवसांत घेणे गरजेचे आहे. मात्र, सध्या लस उपलब्ध होत नसल्याने दुसरा डोस वेळेत घेतला जात नसल्याने या लसीचा प्रभाव कायम राहणार की नाही अशी शंका नागरिकांना आहे.