प्रज्ञा केळकर-सिंग । लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : वेळ सकाळी ८.५७ ची... काही क्षणांमध्येच लोकल येणार असल्याची घोषणा शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर झाली आणि प्रवाशांची पळापळ सुरू झाली... दिव्यांग व्यक्तीही लोकलमध्ये चढण्यासाठी सरसावल्या लोकल स्थानकात दाखल होताच दोन-तीन महाविद्यालयीन तरुणांनी दिव्यांगांच्या डब्याकडे धाव घेतली. लोकल काही सेकंदच थांबत असल्याने अपंग व्यक्तींची त्रेधातिरपिट उडाली. आपल्याला आधी चढू देण्याची विनंती करताच त्या तरुणांनी ‘एवढा मोठा दरवाजा आहे, एका बाजूने चढा, की आम्हाला कशाला हटकता’ अशी इशारावजा धमकीच दिली. लोणावळा ते पुणे प्रवासादरम्यानही दिव्यांगांच्या डब्यामध्ये सर्वसाधारण प्रवाशांनी घुसखोरी दररोजची आहे. पुणे-लोणावळा लोकलमध्ये दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यामध्ये घुसून दादागिरी करण्यात येत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आला आहे. लोकलमध्ये दिव्यांगांसाठी दोन डबे आरक्षित करण्यात आलेले असतात. तशा प्रकारचा फलक डब्याबाहेर लावलेला असतो. तरीही, गर्दीच्या वेळी लोकलमध्ये पटकन् चढून आपल्या इच्छित स्थानकावर पोहोचण्यासाठी तरुणांची तारांबळ उडालेली असते. त्यामुळे कोणताही मागचा-पुढचा विचार न करता ते थेट दिव्यांगांच्या डब्यात चढतात. याबाबत दिव्यांगांनी हटकले असता, ते मुजोरपणे उत्तरे देतात. याबाबत अनेकदा तक्रारी केल्या आहेत. डब्यामध्ये पोलीस, तिकीट तपासनीस गस्त घालत असतील, तर मात्र हे प्रवासी काहीही न बोलता दुसऱ्या डब्यामध्ये चढतात. अशा प्रवाशांना अनेकदा दंड ठोठावला असल्याचे तिकीट तपासनीसाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अनेकदा दिव्यांगांच्या डब्यात सर्वसाधारण प्रवासीही दिसून येतात. गर्दीच्या वेळेत यात भरच पडते. दिव्यांग प्रवाशांना डब्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेत रेल्वेतर्फे अनेकदा कारवाई केली जाते. मात्र, पोलिसांची गस्त नसताना सामान्य प्रवासी अपंगांनाच दमदाटी करत असल्याचे अनुभव अपंग प्रवाशांनी कथन केले. एखादा सामान्य प्रवासी सुरुवातीच्या स्थानकापासूनच अपंगांच्या डब्यात चढून जागा अडवून बसलेला असतो. पुढील स्थानकावर दिव्यांग प्रवासी चढल्यावर त्याने बसायला जागा देण्याची विनंती केल्यास ‘दुसरीकडे बसा’ किंवा ‘जागेवरून उठवायला मीच सापडलो का तुम्हाला,’ अशी उत्तरे दिली जातात.
दिव्यांगांच्या डब्यामध्ये दांडगाई
By admin | Published: June 10, 2017 2:02 AM