आंबेठाण : गेल्या अनेक दिवसांपासून आंबेठाण परिसरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. घाटेवस्ती येथील बालकावर या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. या मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी सरपंच दत्तात्रय मांडेकर यांनी केली आहे.
राजवीर गणेश लांडगे (वय ४ वर्षे, रा. आंबेठाण, घाटेवस्ती) हे लहान मूल काल सकाळी अंगणात खेळत असताना अचानक चार ते पाच हिंस्र भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून डोके, हात, पाय व पाठीवर खोलवर चावे घेतले आहेत. गंभीर जखमी बालकाला रुग्णालयात दाखल केले आहे. लहान मुलाचा आवाज ऐकून घरातील लोकांनी या कुत्र्यांना मोठ्या मुश्किलीने हुसकावून लावले. घटनेनंतर या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने केले आहे.आंबेठाण परिसरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. दिवसरात्र फिरणाºया या मोकाट कुत्र्यांमुळे घराबाहेर पडणेही जिकिरीचे झाले आहे. रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांना ही कुत्री केव्हा चावा घेतील, याचा अंदाज नसल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या महिन्यात चाकण येथील खंडोबा माळावर व चाकणजवळील खराबवाडी येथे सात वर्षांच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले होते. एखाद्याला कुत्रे चावल्यानंतर त्याला चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात देण्यात येणारी लसही मिळेल की नाही, याचा भरवसा नाही. यामुळे जखमी झालेल्यांना पुढील उपचारासाठी पिंपरी चिंचवड अथवा पुणे येथे दवाखान्यात न्यावे लागते. त्यामुळे रुग्णासह नातेवाइकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी सरपंच दत्तात्रय मांडेकर, ग्रामविकास अधिकारी सयाजी क्षीरसागर आदींसह ग्रामस्थांनी खेड पंचायत समिती आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे केली आहे.आंबेठाणच्या दोन ते तीन किलोमीटर परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा डेपो आहे. त्याचप्रमाणे या भागात अनेक ठिकाणी लहान-मोठ्या कंपनीतील कामगारांचे उरलेले शिळे अन्न व इतर पदार्थ आजूबाजूच्या परिसरात टाकण्यात येत आहे. त्यामुळे ही मोकाट कुत्री यावर ताव मारून हिंस्र होतात.पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून ही कुत्री रात्रीच्या वेळी आणून सोडली जात आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.आंबेठाण, बिरदवडी, वाघजाईनगर, दवणेमळा, घाटेवस्ती, सोळबन वस्ती आदी परिसरात ही भटकी कुत्री मोठ्या संख्येने फिरत आहेत.मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी येथील नागरिकांनी मागणी करुनही अद्याप याचा बंदोबस्त केला गेला नाही.