पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पहिल्या टप्प्यात पुणे-सातारा महामार्ग ते नगर महामार्ग यांना जोडणारा रिंग रोड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘आंबेगाव खुर्द ते वाघोली’ या ३३ किमी लांबीचा रिंग रोड विकसित केला जाणार आहे. येत्या दोन महिन्यांत निविदा काढली जाणार असून, यासाठी सुमारे ६५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली.याबाबत गित्ते यांनी सांगितले की, पीएमआरडीएने प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंग रोड विकसित करण्याचा निर्णय घेतला. एकूण रिंग रोड हा १२३ किमी लांबीचा असणार आहे. या रिंग रोडसाठी टीपी स्किमचे मॉडेल राबविले जाणार आहे. हा रिंग रोड १० पदरी असणार आहे. प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यात पुणे- सातारा महामार्ग ते पुणे-नगर महामार्ग जोडण्याचा निर्णय घेतला आहे. आंबेगाव खुर्द-मांगडेवाडी - पिसोळी -वडाचीवाडी- हांडेवाडी- होळकरवाडी- वडकी - उरुळी देवाची- कदमवाकवस्ती-मांजरी खुर्द-आव्हाळवाडी-वाघोली असा रिंग रोडचा मार्ग असणार आहे. सुमारे ३३ किमी लांबीचा रिंगरोड विकसित केला जाणार आहे. आंबेगाव खुर्द ते वाघोली या रिंग रोडसाठी निविदा प्रकिया राबविली जाणार आहे. दोन महिन्यांत या रस्त्यासाठीची निविदा अंतिम केली जाणार आहे. यासाठी सुमारे ६५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. १० पदरी असलेल्या रिंग रोडमध्ये सुरुवातीला सर्व्हिस रोड पहिल्यांदा केला जाणार आहे. सर्व्हिस रोड हा चार लेनचा केला जाणार आहे. त्यानंतर उर्वरित लेन केल्या जाणार आहेत. या ३३ किमी लांबीच्या रस्त्यामध्ये आंबेगाव खुर्द येथे एक बोगदा, मांगडेवाडी येथे दोन बोगदे आणि येवलेवाडी येथे एक बोगदा असणार आहे. पुणे-जेजुरी रेल्वे मार्ग आणि पुणे दौंड रेल्वे मार्ग, असे दोन पूल असणार आहे, तर मुळा-मुठा नदीवर एक पूल असणार आहे. त्याचबरोबर या रिंग रोडला जोडणारे तब्बल ४२ रस्तेही प्राधिकरणाकडून विकसित केले जाणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त गित्ते यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात असा असेल रिंगरोडसातार रस्ता येथील आंबेगाव खुर्द-मांगडेवाडी - पिसोळी -वडाचीवाडी- हांडेवाडी- होळकरवाडी- वडकी - उरुळी देवाची- कदमवाकवस्ती-मांजरी खुर्द-आव्हाळवाडी-वाघोली, असा रिंग रोडचा मार्ग असणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात असलेली एकूण १ हजार २७८ हेक्टर शासकीय जमीन पीएमआरडीएला हस्तांतरित करण्यासाठीचा प्रस्ताव दिला आहे. जमिनीच्या बदल्यात जमीन या तत्त्वानुसार जमीन संपादित केली जाईल. त्याचे मूल्यांकन करण्याचे काम पूर्ण झाले असून, आगामी दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.- किरण गित्ते, महानगर आयुक्त, पीएमआरडीए