पुणे : प्रेक्षकांनो हुशार व्हा! जगातल्या काळ्या आणि पांढऱ्या छटांच्या द्वंद्वात पडू नका. वैचारिक संदिग्धता, उपद्रव माजविणा-यांबाबत असहमत असाल आणि भीतिरहित संवाद साधायचा असल्यास दोन्हींचे मिश्रण असलेली करडी छटा स्वीकारा. समाजात विरोधाभास दर्शविणाºया संकल्पना, कोणत्याही गोष्टीच्या खोलात जाऊन विश्लेषण न करताच माथी मारल्या जात आहेत, हे घडू न देण्यासाठी चांगल्या आणि वाईटाचा स्वीकार करणारी सहिष्णुता निर्माण होणे हीच आता काळाची गरज आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी सद्यपरिस्थितीचा धांडोळा घेत प्रेक्षकांना ‘सुज्ञ’ होण्याचे आवाहन केले.आशय फिल्म क्लबतर्फे आयोजित ९व्या आशियाई चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांना यंदाचा ‘झेनिथ एशिया सन्मान’ नवसिनेमाचे प्रणेते कुमार शाहनी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या डेप्युटी डायरेक्टर कीर्ती तिवारी, चित्रपट महोत्सवाचे संयोजक सतीश जकातदार आणि वीरेंद्र चित्राव आदी मान्यवर उपस्थित होते.पालेकर म्हणाले, समाजात तिसºया परिप्रेक्ष्यातून पुनरुत्थान घडायला हवे. ‘पद्मावत’मध्ये चुकीच्या इतिहासाचे चित्र रेखाटण्यात आले आहे असे म्हणणाºया सोयीस्कर लोकांच्या जगात कलात्मक कामाचा आदरही दाखवला जायला हवा. टीएम कृष्णा यांचे येशू आणि अल्ला यांच्यावरील गाण्यांचे सादरीकरण आवडत नाही म्हणून त्यांचा कार्यक्रम रद्द करण्यासाठी लोक आंदोलन करत असतील तर त्याचेही स्वागत करायला हवे. नसरुद्दीन शाह जरी हिंसाचाराबद्दल त्याचे भय व्यक्त करीत असेल तरीही एक अभिनेता म्हणून त्याच्याबद्दलचे प्रेम आणि आदर कायम ठेवतील आणि आमिर खानने ‘खान’ असूनही महाभारतात कृष्णाची भूमिका केली तरी त्याला ‘ट्रोल’ करणार नाहीत. एक सामाजिक उत्तरादायित्व असलेला कलाकार या नात्याने या विभागणीच्या काळात करड्या रंगाच्या छटेचा शोध घेत आहे. ‘शहरी नक्षलवाद’च्या कथा संपल्या जाऊ नयेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरेंद्र चित्राव यांनी केले, तर सतीश जकातदार यांनी आभार मानले.‘स्वदेशी’पणा नष्ट होतोय...काही दुर्मिळ कलाकारांमधला मी असा एक आहे, ज्याने पैशासाठी किंवा आर्थिक गणितांसाठी चित्रपटांचा कधीच स्वीकार केला नाही, याचा मला अभिमान वाटतो. चित्रपटाच्या विषयाचा संरचनात्मक प्रवाह हा माझ्यासाठी नेहमीच महत्त्वपूर्ण ठरला. मुख्य प्रवाहातील व्यावसायिक चित्रपटांनी मला कधीच भुरळ घातली नाही. त्यामुळे कितीतरी चित्रपट मी नाकारले. दुर्दैवाने ‘बॉलिवूड’ हे भारतीय चित्रपटसृष्टीचा चेहरा बनले आहे. या दृष्टिकोनामुळे भारतीय चित्रपटांचा ‘स्वदेशी’पणा नष्ट झाला आहे. त्यामुळे मी प्रादेशिक चित्रपटांना पाठिंबा देत आहे. म्हणूनच मी बंगाली, मल्याळम, कन्नड आणि मराठी चित्रपटांचा अधिकतर स्वीकार केला असल्याची कबुली पालेकर यांनी दिली.कुमार शाहनी म्हणाले, अमोल पालेकरांबरोबरच्या आठवणी समृद्ध करणाºया आहेत. पालेकरांसारखा अभिनेता, दिग्दर्शक यामुळे चित्रपट सृष्टीत अनेक नवीन विषय हाताळले गेले.
चांगल्या-वाईटाचा स्वीकार करणारी सहिष्णुता हवी, अमोल पालेकर यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 2:15 AM