आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीला आम्ही महविकास आघाडी म्हणूनच सामोरे जावे अशी आमची इच्छा आहे. राज्यभरात सर्व महापालिकांमध्ये निवडणुकीसाठी आघाडी व्हावी ही आमची इच्छा आहे असं सेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. दरम्यान पुणे महापालिकेत आघाडी केली तरी त्यात ८० सीट्स सेना लढवेल असं ते म्हणाले.
खेड मध्ये सेना आणि राष्ट्रवादी मध्ये झालेल्या वादानंतर खासदार संजय राऊत यांनी काल खेड मध्ये सेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पुण्यात शनिवारी सकाळी सेनेचा पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.यावेळी आगामी महापालिका निवडणुकांबाबत चर्चा झाली. महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याचा दृष्टीने तयारी करावी अशी सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आली.आघाडी झाली तर एकत्र नाहीतर स्वबळावर काढायची तयारी करायची अशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.सर्व ठिकाणचे इच्छुक शोधून ठेवा. निवडणूक ज्याला लढवायची आहे त्याने प्रत्येकानी तयारीला सुरुवात करा अशी सूचना या बैठकीत करण्यात आली. सत्ता स्थापन कशी होईल त्यासाठी जे करता येईल हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल असे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले.
याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले,"आज सकाळ पासून महापालिकेसंदर्भात बैठक सुरु आहे. महाविकास आघाडी म्हणून लढायचं का किंवा स्वतंत्र लढायचं का हे ठरवू. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढावे अशी आमची भुमिका आहे."
गेल्या वेळी भाजप ला मिळालेल्या यशाबद्दल ते म्हणाले "भाजपची संघटनात्मक बांधणी नसतानाही त्यांना जागा मिळाल्या. एखादी लाट चालते "
दरम्यान महाविकास आघाडी म्हणून पुण्यातील निवडणूक लढवताना सेनेने ८० जागा मिळवल्या ही आमची अपेक्षा आहे असंही राऊत म्हणाले.प्रभाग रचना बदलणार का याबाबत विचारल्यावर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिंकावं ही आमची भुमिका आहे. त्यासाठी जे जे करावं लागेल ते करणार असंही राऊत यांनी सांगितले.