नम्रता फडणीस
पुणे : टाळेबंदीच्या काळात शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळविण्यासाठी ११९२ दावे दाखल झाले. त्यापैकी १००४ दाव्यांत परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यात आले. एका सुंदर नात्याची परिणिती घटस्फोटापर्यंत जात असेल तर नक्की काय चुकतंय याचा विचार करायला हवा आणि हे टाळायचे असेल तर तरुण-तरुणींनी विवाहपूर्व समुपदेशन करुन घेतले पाहिजे, असे सांगितले जात आहे.
समुपदेशनाद्वारे एकमेकांचे स्वभाव, विशिष्ट प्रसंग किंवा परिस्थितीमध्ये दोघांची वैचारिकता, एकमेकांबरोबर खरोखर संसार करायचा आहे का, कशा प्रकारे संसार सुरळीत होऊ शकेल हे जाणून घेता येईल. दोघेही परस्परपूरक नसतील तर मग लग्नाचे पाऊल उचलायचे का याचाही पुनर्विचार विवाहेच्छुक तरुण-तरुणींना करता येईल. यासाठी विवाहपूर्व समुपदेशन काळाची गरज असल्याचे विवाह समुपदेशक सांगतात.
“केवळ टाळेबंदीमध्येच नव्हे तर अलीकडच्या दोन दशकांत घटस्फोटाचे प्रमाण सातत्याने वाढत आले आहे. आपण ‘कुटुंबकेंद्रित’ रचनेकडून ‘व्यक्तिकेंद्रित’ समाजरचनेकडे चाललो आहोत. जो प्रवास ‘आम्ही’कडे व्हायला हवा होता तो ‘मी’पणाकडे येऊन ठेपला आहे. समोरच्या माणसाला स्वीकारण्याची आणि सहन करण्याची क्षमता कमी झाली आहे. लग्न का नि कशासाठी करायचं? त्यासाठी दोघांनी काय करायला हवं हे तरूण-तरूणींना शांतपणे नीट समजून सांगायला हवे,” असे लीना कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
चौकट
घटस्फोटाच्या दाव्यांमध्ये दरवर्षी वाढ
गोव्याच्या कायदेमंत्र्यांनी राज्यातील वाढत्या घटस्फोटांबाबत चिंता व्यक्त करीत विवाह नोंदणीच्या वेळी जोडप्यांचे समुपदेशन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पुण्यात गेल्या अडीच वर्षात परस्पर संमतीने घटस्फोट मिळविण्यासाठी ३ हजार ३५२ दावे दाखल झाले आहेत. विवाहपूर्व समुपदेशन हाच वाढते घटस्फोट रोखण्यावरील उत्तम उपाय असल्याचे विवाह समुपदेशकांना वाटते.
चौकट
लग्न कशासाठी हेच कळत नाही
“तरुणांमध्ये लग्न का करायचे याबाबत बरेचदा अस्पष्टता दिसून येते. वय झालंय किंवा घरचे म्हणतात म्हणून लग्न करायचंय किंवा करिअरमध्ये स्थिरस्थावर झालोय म्हणून करायचंय, या गोष्टी लग्नासाठी पुरेशा नाहीत. लग्नामध्ये सहचर्य, प्रेम, शारीरिक गरज या मूलभूत गरजा आहेत. बरेचदा मुलांना ही कल्पना नसते की लग्न म्हणजे एक जबाबदारी आहे. केवळ एकमेकांकडून अपेक्षा असता कामा नयेत. याची जाणीव आम्ही करून देतो. लग्न म्हणजे फक्त नवरा-बायकोचं नाते नाही. तर त्यात कुटुंबदेखील येते. वयाच्या वेगळ्या टप्प्यावर गेल्यावर तुमचा प्राधान्यक्रम बदलतो. त्यातून मग प्रेम संपले असे वाटते. पण ते तसं नसतं. हे देखील समजावून सांगितले जाते. लग्नामधून एकमेकांना आनंद, सुख मिळाले पाहिजे. त्यासाठी हे समुपदेशन आवश्यक आहे.” - दीपा राक्षे, मानसोपचारतज्ज्ञ
चौकट
“विवाहपूर्व समुपदेशन आवश्यक आहे. त्यातून एकमेकांचे स्वभाव, अपेक्षा कळतात आणि लग्नानंतर उदभवणाऱ्या समस्या टाळता येतात. एकमेकांकडून काय अपेक्षा आहेत याची स्पष्टता लग्नापूर्वी मनमोकळेपणाने झाली तर घटस्फोट निश्चितच टाळता येतील.”
- अँड. वैशाली चांदणे, अध्यक्ष फँमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन