पुणे : आर्यन वर्ल्ड शाळेने आयोजित केलेल्या भारतातील पहिल्या ‘वर्ल्ड आॅफ विंग्ज २०१७’ या अनोख्या प्रदर्शनामध्ये परदेशी पक्ष्यांसह माशांच्या विविध जाती आणि प्रजाती पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. हे प्रदर्शन स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा हॉल येथे दि. २५ ते २९ आॅक्टोबर दरम्यान सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत रसिकांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दि. २५ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी गडकिल्ले आणि त्यांच्या कथांची आणि संवर्धनाची पुस्तके दुर्गवीर प्रतिष्ठानला सुपूर्द केली जातील. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मुक्ता टिळक उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनात परदेशी पक्षांच्या १५० जाती आणि माशांच्या ५० जातींसह दुर्लक्षित पक्षी आणि प्राणीसुद्धा पाहता येतील. सामाजिक हेतूने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
सन कोनुर, आफ्रिकन ग्रे, ब्ल्यू गोल्ड मकाऊज, ग्रीन विंग मकाऊज, स्कार्लेट मकाऊ, सेनेगल पॅरट, यलो सायडेड कोनुर, सीनमोन कोनुर, गाला कोकट, नांदाय कोनुर, कोकटेल बर्ड, कानारी, सल्फर कोकटू, लोरीकीट, रोसेल्ला, अॅमाझोन पॅरट , इक्लेकट्स पॅरट, आफ्रीकन लव्ह बर्ड्स, बडगेरीगर, गुल्डीयन पॅरटलेट्स, क्वेकर पॅरट , पॅराकीट, स्प्लेंडीड पॅराकिट, बुर्क पॅराकिट, नेकेड आय कॉकॅटू ,मौलुक्कन कॉकॅटू, हान्स मकाऊ, नॉर्मल क्वॉलीस, लेडी अॅमरहेस्ट फीझंट, झेब्रा फिंच, आफ्रिकन गोल्डन ब्रेस्टेड फिंच, जावा फिंच, रेड आयब्रोवड आफ्रिकन फिंच, आऊल फिंच, गोल्डन फिझंट, ब्लिडिंग हार्ट डोव्ह, तुर्को डोव्ह, मंडारीन डक्स, पॅरट फिंच, व्हिक्टोरीया क्राऊन्ड पिजन हे संपूर्ण भारतभर आढळणारे पक्षी यांत असतील.
विविध पिसांचे आणि प्रकारातील पाहाणे रसिकांसाठी मेजवानी असेल. त्याशिवाय या आयोजनामध्ये १० अॅक्वेरीयममध्ये परदेशी मासे असतील तर छायाचित्रांच्या गॅलरीमध्ये भारतीय वन्यजीवनातील कित्येक दुर्मिळ पक्षीही असतील.