पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच संलग्न संशाेधन केंद्रामध्ये पीएचडी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी येत्या नाेव्हेंबर महिन्यांत प्रवेश अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात हाेणार आहे. तसेच, पीएचडी प्रवेशपरीक्षा पेट डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयाेजित केली जाईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने परीक्षेसंदर्भात तयारीला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी विद्यापीठांशी संलग्न संशाेधन केंद्रातील मार्गदर्शक प्राध्यापकांना त्यांच्याकडे असलेल्या रिक्त जागांसंदर्भात माहिती देण्यासंदर्भात सूचना केली आहे. त्यासाठी दि. २० सप्टेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे. केंद्रांनी रिक्त जागांची माहिती वेळेत पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यंदा सुमारे दाेन हजार जागा रिक्त असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, रिक्त जागांची माहिती अपडेट हाेताच नाेव्हेंबर महिन्यांत पेट परीक्षेसंदर्भात ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवून घेतले जातील आणि डिसेंबरमध्ये पेट परीक्षा घेण्यात येणार आहे.