पुणे : कोथरूड भागातील संगम तरुण मंडळाला अफजल खानचा वध या विषयावरील जिवंत देखावा दाखविण्यास कोथरुड पोलिसांनी परवानगी नाकारली. शहरात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून परवानगी नाकारली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या मुद्द्यावरून लोकमतने मंडळाचे कार्याध्य्क्ष आणि ब्राहमण महासंघाचे पुणे अध्यक्ष आनंद यांच्याशी संवाद साधला. यावेळी शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवायला पाकिस्तानात जायचं का? असा सवाल मंडळाने उपस्थित केला आहे. तर आम्ही भूमिकेवर ठाम असून देखावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कोथरूड येथील संगम तरुण मंडळ ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सवामध्येछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना व प्रसंगावर आधारित देखावा सादर होतो. या वेळी मंडळाने गणेशोत्सवासाठी अफजलखानाचा वध या विषयावरील जिवंत देखावा सादर करण्यात येणार असून त्यासाठी परवानगी द्यावी, अशा मागणीचे पत्र कोथरूड पोलिसांना पाठविले होते. दरम्यान, कोथरूड पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमवेत चर्चेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, म्हणून हा देखावा सादर करण्यास परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पत्र संबंधित मंडळाला पाठविले होते.
मंडळाचे कार्याध्यक्ष संजय काळे म्हणाले, संगम तरुण मंडळाला यंदा ५६ वर्ष पूर्ण होतील. गेले पंचवीस वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज, छ्त्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे सादर करत आलो आहोत. शिवाजी महराज यांचा राज्यभिषेक, गड आला पण सिंह गेला, पावनखिंड लढाई, शाहिस्तेखानाची बोटं कापले, आग्र्याहून सुटका असे विविध देखावे सादर केले आहेत. यंदा अफजलखानाचा वध देखावा सादर करायचा होता. त्याच्या परवानगीसाठी आम्ही पोलिसांकडे गेलो होतो. त्याबाबतीत आम्ही पोलिसांना रीतसर पत्र पण दिलं होतं. तेव्हा ते काही बोलले नाहीत. मात्र नंतर त्यांचं पात्र आम्हाला प्राप्त झालं. त्यात लिहिलं होतं की, 'जातीय तेढ निर्माण होईल म्हणून आम्ही तुम्हाला परवानगी नाकारतोय.'
आम्ही भूमिकेवर ठाम आहोत. आम्ही देखावा करणार. आपण रोज घेतो तो श्वास आणि खातो तो घास हे फकत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे. मग या शिवाजी महाराज यांचा इतिहास जर आम्ही हिंदुस्थानात दाखवायचं नाहीतर तो दाखवायला काय आम्ही पाकिस्तानात जायचं का? इतिहास नाकारता येणार आहे का...? पोलीस म्हणतात वरून आदेश आहे, हे वरून आदेश नेमके कोणाचे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
पोलीस प्रशासनाचा हा अतिशय चुकीचं निर्णय
अफजलखानाच्या वधाचा इतिहास हा लहानपणापासून आपण शिकत आलोय. पण कोणी असं म्हटेलं नाही की हे तर चुकीचं झालं होतं. केवळ कोणाच्या तरी भावना दुखावल्या जातात असा पोलिसाना संशय आहे. सर्वसामान्य मुस्लीम सुध्दा या देखाव्याला विरोध करणार नाही. अफजलखानाने अन्याय अत्याचार केला होता, त्याने तुळजापूरचं मंदिर तोडल होतं, शिवाजी महाराज यांनी त्याचा कोथळा बाहेर काढला होता ही वस्तुस्थिती आहे. मग ती का दाखवायची नाही? उद्या म्हणतील कसाबला फाशी दिली त्याचा उल्लेख कुठेही करू नका कारण आमच्या भावना दुखावतात... मग खरा इतिहास लोकांपुढे मांडायचा नाही का? 'म्हातारी मेली तरी चा पण काळ सोकावू नये' आमचा लहानपणापासून आम्ही इतिहास वाचला आहे. त्यावर पोवाडे आलेत, चित्रपट आलेत... मग सर्वावर तुम्ही बंदी घालणार का? त्यामुळे पोलीस प्रशासनाचा हा अतिशय चुकीचा निर्णय आहे. आम्ही सुद्धा मंडळाच्या बाजूने असल्याचे आनंद दवे यांनी सांगितले आहे.
''आमच्याकडे काही मंडळांनी परवानगी साठी पत्र पाठवली आहेत. परिसरात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यामुले देखावा सादर करू नये, असे मंडळाला आम्ही पत्रातून कळवले आहे. - महेंद्र जगताप (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोथरूड पोलिस ठाणे.)''