लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील हांडेवाडी रोडवरील सय्यदनगर, चिंतामणीनगर परिसरात मोठा पणती या टोळक्याने धुडगूस घालत पानटपरी चालकाचा गळा दाबला. पेट्रोल टाकून घर पेटवून खुनाचा प्रयत्न केला. त्यानंतर या टोळक्याने दोन दुकानांवर दरोडा टाकत गल्ल्यातील रोकड जबरदस्तीने चोरली. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करून मॅनेजरच्या केबीनमध्ये घुसून तोडफोड केली.
याप्रकरणी वानवडी पोलिसांनी नोमन सय्यद व मोठा पणती ऊर्फ रिझवान शेख (रा. चिंतामणीनगर, हडपसर) या दोघांना अटक केली आहे. या घटना सोमवारी सकाळी सात ते रात्री एक वाजण्याच्या दरम्यान घडल्या. नोमन सय्यद, मोठा पणती, आत्तु अन्सारी या तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, दहशत निर्माण करणे असे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी आरिफ रफिक सय्यद (वय ३३, रा. चिंतामणीनगर, हांडेवाडी रोड) यांनी फिर्याद दिली आहे. नोमन व आत्तु या दोघांनी आरिफ यांच्या वडिलांच्या पानटपरीच्या लोखंडी बॉक्सवर दगड मारून शिवीगाळ केली. त्यांना सिगारेट मागितली परंतु लॉकडाऊनमुळे टपरी बंद असल्यामुळे सिगारेट नसल्याचे वडिलांनी सांगितले. त्यावर या दोघांनी त्यांच्या वडिलांना मारहाण केली आणि त्यांचा गळा दाबला. त्यामध्ये ते बेशुद्ध पडले. आरिफ यांनी त्यांना उपचारसाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, आरिफ वडिलांना घेऊन घरी आल्यावर दोन आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. तसेच, आरिफ हे हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्यांच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावली. यावेळी आरिफ यांचे कुटुंबीय घरात होते.
दुसऱ्या घटनेत सागर राजकुमार राठोड (वय २०, रा. सय्यदनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. चिंतामणी अमृततुल्य या चहा दुकानात ते सकाळी ७ वाजता काम करीत होते. त्यावेळी नोमन, मोठा पणती व आत्तु हे तिघे तेथे आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून ८०० रुपये हिसकावून नेले. तेथील मगर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. पंपावरील मॅनेजरच्या रूममध्ये तोडफोड करून मॅनेजर बाळू अंभोरे यांना मारहाण केली.
तिसऱ्या घटनेबाबत केवळराम लादुराम परमार (वय ४१, रा. चिंतामणी नगर) यांनी फिर्याद दिली आहे. ते सकाळी साडेसातच्या सुमारास नवदुर्गा किराणा मालाच्या दुकानात काम करत होते. त्यावेळी हे तिघे जण आले. त्यांनी परमार यांना उलट्या कोयत्याने मारहाण केली. काऊंटरवरील साहित्य रस्त्यावर पाडून नुकसान केले. गल्ल्यातील ३ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली. या प्रकरणात पोलिसांनी तीन गुन्हे दाखल करून दोघांना अटक केली आहे.