लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्रातील रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि अन्य जिल्ह्यांतील अनेक भाग पाण्याखाली गेला आहे. येथील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. लष्कारानेही ऑपरेशन वर्षा २१ अंतर्गत मदत कार्य सुरू केले आहे. शनिवारी बचाव कार्यासाठी पुण्याच्या दक्षिण मुख्यालयात मदत सहाय्यता मोहीम ‘वाॅर रूम’ची स्थापना करण्यात आली असून येथून बचाव पथकांना सूचना दिल्या जात आहे. शनिवारी आणखी अतिरिक्त १० पथके आपत्कालीन स्थितीसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे सत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, ठाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. अनेक गावे पाण्याखाली गेले आहेत. सध्या स्थानिक प्रशासन, एनडीआरएफच्या पथकाद्वारे बचाव कार्य सुरू आहे. शुक्रवारी राज्य शासनाच्या मागणीनुसार लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे. त्यानुसार दक्षिण मुख्यालयाअंतर्गत आैंध मिलिटरी स्टेशन आणि बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे १५ पथके अन्नधान्य आणि वैद्यकीय मदतीसह बचाव कार्यासाठी पाठवण्यात आले होते. शनिवारी आणखी १० पथके बचावकार्यासाठी पाठवण्यात आले. सांगली, पलूस, बुर्ली आणि चिपळूणमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी ही पथके तैनात करण्यात आली असून, आतापर्यंत १०० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. हे बचाव कार्य शेवटपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले.
चौकट
भारतीय लष्करदेखील गावकऱ्यांना टँकरमधून तयार खाद्यपदार्थ आणि पिण्याचे पाणी पुरवत आहे. वैद्यकीय शिबिरे देखील स्थापन केली आहेत, ज्यात पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यात येणाऱ्या स्थानिकांना आवश्यक ते प्रथमोपचार आणि औषधे पुरविण्यासाठी लष्करातील डॉक्टर आणि नर्सिंग सहाय्यकांचे वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. दरड कोसळल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील पोसरे बुद्रूक गावातला मुख्य मार्ग खुला बंद झाला होता. लष्कराच्या पथकाने येथील दरड हटवून हा मार्ग पुन्हा सुरू केला आहे.
फोटो : पूरग्रस्तांना मदत करताना लष्कराचे पथक.