- मंगेश पांडे, पिंपरीगेल्या महिन्यात प्रभाग समित्यांमध्ये (क्षेत्रीय कार्यालयांमध्ये) निवड करण्यात आलेले सदस्य हे केवळ प्रभाग समितीचे स्वीकृत सदस्य आहेत. मात्र, मतदारांमधून निवडून न आलेल्या या सदस्यांना नगरसेवक, नगरसदस्य बनण्याचा मोह आवरता येत नसल्याचे दिसत आहे. कागदोपत्री प्रभागाचे स्वीकृत सदस्य असले, तरी जाहिरात फलकांसह निवासस्थानाकडे जाणाऱ्या फलकांवर मात्र, ‘नगरसदस्य’ हेच पद झळकत आहे. यामुळे नागरिकांचीदेखील गफलत होत आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम २९(अ)अन्वये प्रभाग समित्यांमध्ये बिनसरकारी संघटना व समाजलक्ष यांचे प्रतिनिधी नेमणूक करण्याची तरतूद आहे. यास अनुसरून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग समित्यांमध्ये बिनसरकारी संघटना आणि समाजलक्षी संघटना यांचे प्रतिनिधी घेण्यासाठी अर्ज मागविले होते. सहा प्रभाग समित्यांमध्ये (क्षेत्रीय कार्यालयांमध्ये) प्रत्येकी तीन अशा १८ जागांसाठी ११३ जणांनी इच्छुकता दर्शविली होती. त्यानुसार २१ आॅगस्टला प्रभाग समितीची विशेष सभा घेऊन नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. नियुक्त केलेल्या सदस्यांचा उल्लेख काय असावा, त्यांना कोणते अधिकार आहेत, कोणत्या पद्धतीने काम करावे आदींबाबत महापालिका प्रशासनाने नवनियुक्त सदस्यांचे तीनदिवसीय प्रशिक्षण घेतले. यास सर्व सदस्य उपस्थित होते. मात्र, याचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. मतदारांमधून निवडून आलो नसलो, तरीही ‘नेते’ म्हणून आपली ओळख असावी, असाच उद्देश या नवीन सदस्यांचा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच नियुक्ती जाहीर होताच शुभेच्छा देणाऱ्या जाहिरातफलकांनी आपापला परिसर व्यापून टाकला. गगनाला भिडतील इतक्या उंचीचे फ्लेक्स उभारण्यात आले. त्यावरही थेट ‘स्वीकृत नगरसेवक’ असाच उल्लेख होता. आणि आता घरासमोर, तसेच चौकाचौकांत लोखंडी नामफलक उभारण्यात आले असून, त्यावरही ‘स्वीकृत नगरसदस्य’ असाच उल्लेख आहे. सध्या महापालिकेत मतदान प्रक्रियेतून निवडून आलेले १२८ नगरसेवक आहेत. या लोकांमधून निवडून आलेल्या सदस्यांनाच नगरसेवक अथवा नगरसदस्य असा उल्लेख करता येतो. प्रभाग समिती सदस्य झालेल्यांना नियमाने असा उल्लेख लागून होत नाही. हे सदस्य केवळ प्रभागापुरते मर्यादित असतात. प्रभाग समितीच्या सभेत बसण्याचा अधिकार असतो. मतदान करण्याचा अधिकार नसतो. समाजातील एक प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती असते. मात्र, हे सदस्य थेटपणे नगरसेवक असल्याचा उल्लेख करीत असून, त्याच आविर्भावात वावरत आहेत. निवडीमध्ये ‘राष्ट्रवादी’चा प्रभाव- सामाजिक कार्य करणाऱ्यांना संधी मिळावी यासाठी प्रभाग समिती सदस्यपदी संधी दिली जाते. मात्र, या निवडींमध्ये राष्ट्रवादीचाच प्रभाव दिसत आहे. महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या, तसेच पक्षाचे काम करणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या ‘तगड्या’ व्यक्तींचा प्रभाग समिती सदस्य पदावर भरणा करण्यात आला आहे. त्यामुळे ही सदस्यनिवड आणखीच चर्चेत रहिली. या निवडी घोषित केल्यानंतर अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली. ‘दादां’कडे भूमिका मांडू, असाही पवित्रा घेतला होता.नावापुढे पद अन् खादीची हौस- अनेकांना नावापुढे पद आणि खादी कपडे परिधान करून मिरविण्याची इच्छा असते. मात्र, त्यासाठी समाजहिताचे काम करण्यासह मतदारांमधून निवडून येणेही गरजेचे असते. मात्र, सध्या तशी परिस्थिती राहिलेली नाही. एखादे छोटे-मोठे पद मिळाले, तरी त्याची मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली जाते. हाताशी असलेल्या कार्यकर्त्यांकडून त्याला अधिकच बळकटी देऊन त्या सदस्याला थेट मोठ्या नेत्यांच्याच पंक्तीत नेऊन बसविले जाते. अशीच स्थिती सध्या प्रभाग समितीच्या सदस्यांबाबत झालेली दिसत आहे. असे आहेत प्रभाग सदस्य- ‘अ’ प्रभाग समिती सदस्यपदी सतीश झांबरे, गिरीश कुटे, बेबी नंदा भोंडवे यांची निवड झाली आहे. ‘ब’ प्रभागाच्या सदस्यपदी गोरक्ष पाषाणकर, गिरीश शेंडगे, शरद लुणावत यांची ‘क’ प्रभाग सदस्यपदी सतीश काटे, हमीद शेख, गणेश ढोरे यांची ‘ड’ प्रभाग समितीच्या सदस्यपदी सागर कोकणे, धनंजय मोहिते, शिवाजी पाटोळे यांची ‘ई’ प्रभागाच्या सदस्यपदी विजय रसाळ, प्रकाश सोमवंशी, संजय आहेर यांची तर ‘फ’ प्रभागाच्या सदस्यपदी पंकज भालेकर, जितेंद्र पवार, प्रवीण भालेकर यांची निवड झालेली आहे. निकष कागदोपत्री- प्रभाग सदस्यासाठी अर्ज करणारा व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी असू नये. तसेच केंद्र शासन व राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत नसावा, असे निकष ठरविण्यात आले आहेत. मात्र, सध्याचे बहुतेक सदस्य सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसचे कार्यकर्ते आहेत.
प्रभाग सदस्य झाले स्वयंघोषित नगरसेवक
By admin | Published: October 06, 2015 4:50 AM