पिंपरी : महापालिकेची निवडणूक २०१७ मध्ये होणार आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या ६४ प्रभागांऐवजी वाढीव लोकसंख्या विचारात घेता वॉर्डांची संख्या १३० वर जाणार आहे. गूगल मॅपच्या आधारे ही रचना होणार आहे. फेब्रुवारी २०१२ मध्ये प्रभागरचनेनुसार निवडणूक झाली. त्यामध्ये दोन नगरसेवकांना काम केले. त्यानुसार ६४ प्रभाग निर्माण झाले होते. एका प्रभागात १४ ते १७ हजार लोकसंख्या निश्चित करण्यात आली. आघाडी सरकारने २००२ मध्ये प्रभागानुसार, तर २००७ मध्ये वॉर्डनुसार, २०१२ मध्ये प्रभागानुसार निवडणूक झाली. राज्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे सरकार आल्यानंतर द्विसदस्यीय प्रभाग रचना रद्द करून एकसदस्यीय वॉर्ड रचनेनुसार निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार महापालिकेचा निवडणूक विभाग कामाला लागला आहे. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने सुरू आहे. इच्छुकांची कसरतवॉर्डरचना कशी होणार याबाबत नगरसेवक अनभिज्ञ आहेत. वॉर्ड निश्चित झाल्यानंतर नवीन वॉर्डातील मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनाही मोठी कसरत करावी लागणार आहे. पूर्वी स्थानिक नेते निवडणूक विभागावर दबावतंत्रांचा वापर करून आपल्या सोईनुसार वॉर्ड रचना करून घेत होते. त्यास आता आळा बसणार आहे. त्यामुळे नेत्यांचीही गोची झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वॉर्ड रचनेचे काम होणार असल्याने वॉर्ड कसा असेल, याचा अंदाज अद्यापही आलेला नाही. विकसित विभागांचा, रहिवासी क्षेत्राचा विचार होईल. (प्रतिनिधी)
वॉर्डसंख्या १३० होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2015 6:06 AM