पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार त्रिसदस्यीय अंतिम प्रभाग रचना असलेले ५७ व दोन सदस्यीय एक प्रभाग, असे ५८ प्रभागांच्या सीमा दर्शविणारे नकाशे महापालिकेच्या निवडणूक विभागाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. हे सर्व नकाशे आजपासून (बुधवार) क्षेत्रिय कार्यालय हद्दीनुसार संबंधित कार्यालयांत, तसेच एकत्रितरीत्या महापालिका मुख्य भवनात फलकावर प्रसिद्ध होतील.
पुणे महापालिकेने शहरातील ५८ प्रभागांचा एकत्रित नकाशा व प्रत्येक प्रभागाची व्याप्ती असलेली माहिती १३ मे रोजी रात्रीच जाहीर केली. आजअखेर १७ मेची डेडलाइन लक्षात घेता, पालिका प्रशासनाकडून प्रभागनिहाय ५८ नकाशे महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १७३ आहे.
महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रभागनिहाय नकाशे मंगळवारी सायंकाळी सात वाजता जाहीर करण्यात आले असून, हे नकाशे क्षेत्रिय कार्यालयात, तसेच महापालिका मुख्य भवनामध्ये पाहण्यासाठी बुधवारपासून उपलब्ध राहणार आहेत.
- डॉ. यशवंत माने, उपायुक्त, निवडणूक विभाग पुणे महापालिका